धक्कादायक: निलंग्याचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; औसा-निलंगा परिसरात शोककळा.. लातूर, जि. प्र. (उत्...
धक्कादायक: निलंग्याचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; औसा-निलंगा परिसरात शोककळा..
लातूर, जि. प्र. (उत्तम माने )
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लातूर : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील खंबीर नेतृत्व, माजी पंचायत समिती उपसभापती आणि भारतीय जनता पक्षाचे माजी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे यांचे आज सकाळी साडेसहा वाजता सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघातील राजकीय व सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
अपघातानंतर सुरू होती मृत्यूशी झुंज
मिळालेल्या माहितीनुसार, १० दिवसांपूर्वी मुंबई-पुणे मार्गावरून गावाकडे येत असताना सोलापूरजवळील मोहळ येथे वाकडे यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सोलापूर येथील सी.एन.एस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या दहा दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिमन्यू पवारांचा 'जीवाभावाचा' सहकारी हरपला
ज्ञानेश्वर वाकडे यांच्या निधनावर औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी अत्यंत भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली आहे. पवार म्हणाले की, "२०१७-१८ मध्ये जेव्हा मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून खांद्याला खांदा लावून लढणारा माझा हाडाचा कार्यकर्ता आज हरपला आहे. ६८ गावांची जबाबदारी लिलया पेलणारा आणि संघर्षात खंबीरपणे साथ देणारा माझा जिवलग मित्र आज सोडून गेला, हे मन सुन्न करणारे आहे." पवार यांनी पुढे नमूद केले की, अपघाताच्या दिवसापासून ते वाकडे यांच्या कुटुंबीयांच्या आणि डॉक्टरांच्या संपर्कात होते. कालच त्यांनी रुग्णालयात जाऊन वाकडे यांची भेट घेतली होती, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
राजकीय कारकीर्द आणि जनसंपर्क
ज्ञानेश्वर वाकडे यांची ओळख एक निर्भीड वक्ता, प्रामाणिक कार्यकर्ता आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून होती. त्यांनी माजी उपसभापती, पंचायत समिती (निलंगा) म्हणून उल्लेखनीय कार्य केले. कासार सिरसी माजी मंडळ अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळली. कोकळगावसह परिसरातील ६८ गावांत त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे कोकळगाव ग्रामस्थांसह वाकडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका झुंजार नेतृत्वाच्या जाण्याने लातूर जिल्ह्याने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

No comments