चोपड्यातील शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाची ; गजेंद्र जैसवाल नगरसेवक तथा गटनेता भारतीय जनता पार्टी च...
चोपड्यातील शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाची ; गजेंद्र जैसवाल नगरसेवक तथा गटनेता भारतीय जनता पार्टी चोपडा,यांची मुख्याधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण,सौंदर्यकरण व रंगरंगोटी (कलरिंग) करण्यात यावी, अशी मागणी चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित नागरिकांच्या वतीने अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ इतिहासातील व्यक्ती नसून, आजही समाजाला दिशा देणारे, प्रेरणा देणारे व मार्गदर्शक महापुरुष आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य, शौर्य, सुशासन, राष्ट्रभक्ती व सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय, समानता, संविधान, मानवमूल्ये व बंधुतेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यामुळे हे दोन्ही महापुरुष कोणत्याही एका जाती-धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी आदर्श व अभिमानाचे प्रतीक आहेत.
सध्या या दोन्ही पुतळ्यांची रंगरंगोटी फिकट झालेली असून, सुशोभीकरणाची नितांत गरज असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या काळात या महापुरुषांच्या जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व सार्वजनिक सहभागातून साजरे होणार असल्याने, त्या पार्श्वभूमीवर पुतळे स्वच्छ, देखणे व सुशोभित असणे नागरिकांच्या दृष्टीने गौरवास्पद ठरेल, असेही नमूद करण्यात आले आहे. पुतळ्यांचे सौंदर्यकरण, रंगरंगोटी तसेच सभोवतालच्या परिसराची स्वच्छता व देखभाल केल्यास समाजात सकारात्मक संदेश जाईल, सामाजिक सलोखा वृद्धिंगत होईल आणि भावी पिढीला या महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. तरी सार्वजनिक हित लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण, सौंदर्यकरण व कलरिंग करण्याबाबत संबंधित विभागास तातडीच्या सूचना देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी नम्र मागणी गजेंद्र जैसवाल नगरसेवक तथा गटनेता भारतीय जनता पार्टी चोपडा यांची नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत माहितीस्तव चोपडा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा यांनाही सादर करण्यात आली आहे.
No comments