ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक; धुळे ACBची धडक कारवाई धुळे प्रतिनिधी : (संपादक -:- हेमकांत ग...
ठेकेदाराचे बिल पास करण्यासाठी 8 लाखांची लाच घेताना PWD उपअभियंता रंगेहात अटक; धुळे ACBची धडक कारवाई
धुळे प्रतिनिधी :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
विद्युत ठेकेदाराकडून बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तब्बल 8 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) विद्युत उपविभागाचा उपअभियंता नितीन इंगळे याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. ही कारवाई सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याने शासनाच्या विविध विद्युत कामांचे ठेके घेतले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये व पाड्यांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याच्या कामाचा ठेका तक्रारदारांच्या फर्मला सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत मंजूर झाला होता. जीएसटी वगळता 2 कोटी 37 लाख 29 हजार 356 रुपयांची निविदा मंजूर करून संबंधित कामांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. ही कामे मुदतीत पूर्ण करण्यात आली होती.
मार्च 2025 मध्ये या कामासाठी 41 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले होते. मात्र त्या वेळी उपअभियंता नितीन इंगळे याने 80 हजार रुपयांची लाच स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2 कोटी 2 लाख 5 हजार 525 रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. त्यानंतर बिल अदा केल्याच्या मोबदल्यात 8 लाख 50 हजार रुपयांची लाच मागण्यात आली. पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नसल्याचेही उपअभियंत्याने स्पष्टपणे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणाची ACBने पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. तडजोडीनंतर 8 लाख रुपये स्वीकारण्यास उपअभियंत्याने संमती दिली. त्यानुसार सोमवारी सायंकाळी धुळ्यातील PWD कार्यालयात लाच स्वीकारताना नितीन इंगळे याला रंगेहात पकडून अटक करण्यात आली. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली असून लाचखोरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील तपास धुळे ACBकडून सुरू आहे.

No comments