खामगाव शहरातील दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी व ‘कर माप’ मिळण्याची मागणी; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन पल्लवी पाटील खामगाव (संपादक ...
खामगाव शहरातील दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी व ‘कर माप’ मिळण्याची मागणी; नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
पल्लवी पाटील खामगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
खामगाव शहरातील दिव्यांग नागरिकांना मिळणारा ५ टक्के निधी तसेच शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेले ‘कर माप’ तातडीने देण्यात यावे, अशी मागणी खामगाव शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष सौ. अपर्णाताई सागर फुंडकर व मुख्याधिकारी, नगरपालिका खामगाव (जि. बुलढाणा) यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खामगाव शहरातील नागरिकांसाठी कर माप मिळणे अत्यंत आवश्यक असून, यामुळे शहरातील विकासकामांना गती मिळेल तसेच नागरिकांना विविध नागरी सुविधा सुलभपणे उपलब्ध होतील. विशेषतः दिव्यांग नागरिकांसाठी शासनाने निर्धारित केलेला ५ टक्के निधी प्रत्यक्षात प्रभावीपणे वापरण्यासाठी कर माप असणे गरजेचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
खामगाव शहरासाठी कर माप मिळावे, यासाठी यापूर्वीही अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप या बाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी नागरिकांनी केली आहे. या निवेदनासोबत खामगाव शहरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदनपत्र संलग्न करण्यात आले असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कर माप मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments