adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वाहनांवरील ब्लॅक फिल्म विरोधात आरटीओ–पोलीसांचा धडक कारवाईचा ‘ब्लॅकआउट’..२०२१ वाहनांची तपासणी..४५८ वाहनांवर कारवाई साडेसहा लाखांचा दंड ठोठावला

 वाहनांवरील ब्लॅक फिल्म विरोधात आरटीओ–पोलीसांचा धडक कारवाईचा ‘ब्लॅकआउट’..२०२१ वाहनांची तपासणी..४५८ वाहनांवर कारवाई साडेसहा लाखांचा दंड ठोठाव...

 वाहनांवरील ब्लॅक फिल्म विरोधात आरटीओ–पोलीसांचा धडक कारवाईचा ‘ब्लॅकआउट’..२०२१ वाहनांची तपासणी..४५८ वाहनांवर कारवाई साडेसहा लाखांचा दंड ठोठावला 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या आणि कायद्याने बेकायदेशीर ठरविण्यात आलेल्या वाहनांवरील ‘ब्लॅक फिल्म’ विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभागाने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जोरदार धडक मोहीम राबवली.दि.२८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या विशेष संयुक्त तपासणी मोहिमेत तब्बल २ हजार २१ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोषी आढळलेल्या ४५८ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून,६ लाख ४६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी दिली. या मोहिमेत अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारितील सर्व वायुवेग पथकांनी सहभाग घेतला. याशिवाय जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या पथकांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाहनांची कसून तपासणी केली. 


तपासणी दरम्यान समोरील (दर्शनी) काच व वाहनांच्या खिडक्यांवर बेकायदेशीर ब्लॅक फिल्म आढळलेल्या ४५८ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.आकारण्यात आलेल्या एकूण ६ लाख ४६ हजार रुपयांच्या दंडापैकी आतापर्यंत ३७ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तसेच संबंधित वाहनांवरील ब्लॅक फिल्म्स तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाहीही करण्यात आली.या विशेष मोहिमे दरम्यान केवळ ब्लॅक फिल्मपुरतीच मर्यादा न ठेवता इतर नियमभंगांची देखील तपासणी करण्यात आली.यात वैध विमा नसलेली वाहने, नोंदणी प्रमाणपत्र किंवा वाहन परवाना नसणे,वाहन चालवण्याचा परवाना नसणे,वाहनांतील दिव्यांमधील त्रुटी तसेच वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.दरम्यान,प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी वाहनधारक व चालकांना आवाहन करताना सांगितले की, “जिल्ह्यातील वाहन मालक व चालकांनी मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहनांच्या समोरील व खिडक्यांच्या काचांवर ब्लॅक फिल्म बसवू नये.कायद्याचे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. ”ही धडक मोहीम पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले असून,नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

No comments