यावल येथे शेतात मधमाश्यांचा भीषण हल्ला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसात नोंद भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल शहरातील देशम...
यावल येथे शेतात मधमाश्यांचा भीषण हल्ला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसात नोंद
भरत कोळी यावल :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरातील देशमुख वाड्यात राहणाऱ्या एका तरुणाचा मधमाश्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली असून, या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रविंद्र पाटील (वय ३८), रा. देशमुख वाडा, यावल हे दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास खुबसिंग नयनसिंग पाटील यांच्या मालकीच्या निमगाव शिवारातील शेतात कामासाठी गेले होते. काम करत असताना शेतातील एका झाडावर असलेल्या असंख्य मधमाश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. मधमाश्यांच्या चाव्यांमुळे गणेश पाटील गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ बेशुद्ध अवस्थेत यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गणेश पाटील यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती राहुल रमेश झामरे (वय ३३) यांनी दिल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, गणेश पाटील हे कुटुंबातील एकुलते एक पुत्र असल्याने त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, यावल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments