जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) व्य...
जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
व्यास शिक्षण मंडळ संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल, यावल येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अत्यंत आनंददायी व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री शरद भाऊ महाजन होते. कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे असिस्टंट सेक्रेटरी माननीय श्री ए. बी. महाजन, आय.टी.आय.चे प्राचार्य श्री गिरीश वाघुळदे, सेमी माध्यमाच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन, इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या सौ. दिपाली धांडे, प्रवीण झोपे सर, पर्यवेक्षिका सौ. राजश्री लोखंडे, तसेच सौ. गौरी भिरूड मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी व स्वर्गीय जे. टी. महाजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती आपले प्रेम, आदर व कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी दिलेले संस्कार, चांगले विचार व भविष्यासाठी केलेले मार्गदर्शन याबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले. यामुळे उपस्थित शिक्षकवृंद भावनाविभोर झाले.
यानंतर शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देण्यात आल्या. शिक्षकवृंदांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्याचा सल्ला देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सौ. रंजना महाजन यांनी स्पर्धेच्या युगात स्किल डेव्हलपमेंटचे महत्त्व अधोरेखित केले. तर असिस्टंट सेक्रेटरी ए. बी. महाजन यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे अष्टसूत्र सांगून शिक्षणासोबत सर्वांगीण विकास किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले.
आय.टी.आय.चे प्राचार्य श्री गिरीश वाघुळदे यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार ध्येयनिश्चिती करून आत्मविश्वासाने वाटचाल करण्याचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात माननीय श्री शरद भाऊ महाजन यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्यासच यश मिळते, असे सांगत आई-वडिलांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांचीच असल्याचे प्रेरणादायी विचार मांडले. यावेळी सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अर्चना पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मनीषा पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थी, अतिथी, शिक्षक व कर्मचारीवर्ग यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. अशा प्रकारे हा निरोप समारंभ अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

No comments