भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात अनियमिततेचा संशय; फेर चौकशीचे आदेश भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ तालुक्यात...
भुसावळ तालुक्यात दुष्काळी अनुदान वाटपात अनियमिततेचा संशय; फेर चौकशीचे आदेश
भुसावळ प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुसावळ तालुक्यात सन 2022-23 मध्ये झालेल्या दुष्काळासाठी मंजूर झालेले अनुदान सन 2024-25 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले. मात्र या अनुदानाच्या वाटपात शासनाची फसवणूक व गंभीर अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ दिनांक 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा श्री. सानप यांनी दिला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी पत्र देण्यात येऊन बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे व अनुदान वाटपाची यादी उपलब्ध करून देण्यात आली.
मात्र या यादीची पाहणी केल्यानंतर अनुदान वाटपात अपहार झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा श्री. सानप यांनी केला आहे. त्यानुसार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर तक्रार अर्ज सादर केला. या तक्रारीत काही शेतकऱ्यांचे गट नंबर चुकीचे असल्याचे, काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा न झाल्याचे, तसेच एका प्रकरणात कोणतीही शेती अथवा सातबारा उतारा नसताना बनावट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी, भुसावळ विभाग यांना फेर चौकशीचे आदेश देण्यात आले असून, चौकशीअंती स्वयंस्पष्ट अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे भुसावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.

No comments