४ फेब्रुवारी : जागतिक कॅन्सर दिन विशेष उत्तर महाराष्ट्रात कॅन्सर जनजागृती अभियान व कॅन्सर रुग्णांसाठी कौन्सिलिंग सेंटर उभारणार – राज मोहम्म...
४ फेब्रुवारी : जागतिक कॅन्सर दिन विशेष
उत्तर महाराष्ट्रात कॅन्सर जनजागृती अभियान व कॅन्सर रुग्णांसाठी कौन्सिलिंग सेंटर उभारणार – राज मोहम्मद इस्माईल खा शिकलगर
कॅन्सर हे नाव ऐकताच आजही अनेकांच्या मनात भीतीचे सावट पसरते. कॅन्सर हा आज जगभर झपाट्याने वाढणारा, जीवघेणा आजार बनला असून योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास या आजारावर मात करणे शक्य आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. भारत सरकार, महाराष्ट्र शासन तसेच विविध सामाजिक संस्था कॅन्सर जनजागृतीसाठी प्रयत्न करत असल्या तरी आजही ग्रामीण भागात या आजाराबाबत भीती, अज्ञान व गैरसमज मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. धावपळीच्या जीवनात लोकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून आरोग्यविषयक योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज बनली आहे.
आज ४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील कॅन्सरवर १६ वर्षांपूर्वी यशस्वी मात करून आपले संपूर्ण आयुष्य कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी समर्पित करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे राज मोहम्मद इस्माईल खा शिकलगर. कॅन्सरमधून मिळालेल्या “बोनस आयुष्याचे” सोने करत त्यांनी जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सरग्रस्त रुग्ण हेल्प सेंटरच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी समुपदेशन, मार्गदर्शन व विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले आहेत.
कॅन्सरग्रस्तांच्या वेदना त्यांनी स्वतः अनुभवल्याने त्यांचे कार्य अधिक संवेदनशील, आत्मीय आणि परिणामकारक ठरत आहे. आता ते उत्तर महाराष्ट्रात व्यापक कॅन्सर जनजागृती अभियान राबविणार असून कॅन्सर उपचारानंतर रुग्णांना मानसिक, सामाजिक व भावनिक आधार मिळावा यासाठी स्वतंत्र कौन्सिलिंग व आधार केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी काही महत्त्वाच्या मागण्यांसाठी राज मोहम्मद शिकलगर महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत. कॅन्सरग्रस्त रुग्णांना एस.टी. महामंडळाच्या बस प्रवासात कायमस्वरूपी ७५ टक्के तिकिट सवलत मिळावी व ही सवलत केवळ उपचारापुरती मर्यादित नसावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कॅन्सरग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पेन्शनसाठी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करावी, अशी मागणीही शासनाकडे करण्यात येणार आहे.
यावेळी त्यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णांना आशेचा संदेश देताना सांगितले की, “कॅन्सरला घाबरू नका. वेळेवर उपचार घ्या. आज कॅन्सरवर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. आपण कॅन्सरवर मात करून त्याला ‘कॅन्सल’ करू शकतो आणि आपले पुढील आयुष्य आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगू शकतो. सर्व काही आपल्या हिंमतीवर अवलंबून आहे.”
कॅन्सरविषयी कोणतीही शंका, समुपदेशन किंवा मार्गदर्शन हवे असल्यास कॅन्सर रुग्ण हेल्प सेंटर, चोपडा (जि. जळगाव) येथे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
📞 मोबाईल : 9665195692 / 7020055760

No comments