श्रीक्षेत्र पद्मालय परिसरात अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ. प्रा.सुधीर महाले. प्रतिनिधी - (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
श्रीक्षेत्र पद्मालय परिसरात अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ.
प्रा.सुधीर महाले. प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र पद्मालय येथून म्हसावद कडे जाणा-या रस्त्याचा कडेला असलेल्या जंगलात तीस ते पस्तीस वर्षीय महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.सदर महिलेची हत्या करून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने महिलेचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान अनोळखी महिलेची ओळख पटवून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. याबाबत माहिती अशी,श्रीक्षेत्र पद्मालय येथून म्हसावदकडे जाणा-या रस्त्यावर वनविभागाच्या विश्रामगृहाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह पडला असल्याची माहिती ग्रामस्थांनी हवालदार राजेश पाटील यांना दिली.महिलेच्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले.सदर महिलेचे वय तीस ते पस्तीस वर्ष असून उंची सुमारे पाच फुट रंग सावळा आहे.महिलेच्या कंबरेच्या वरील सर्व शरीर जाळण्यात आले आहे.महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळण्यात आले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.महिलेच्या मृतदेहापासून केवळ पाच ते दहा फुट अंतरावर दोन बिअरच्या बाटल्या आढळून आल्या असून महिलेची ओळख पटवून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी,चाळीसगाव विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर,अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.घटनास्थळी श्वान पथकास देखील बोलावण्यात आले होते.पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तपासाबाबत पोलिसाना सुचना केल्या.रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.महिलेच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर हत्येचे नेमके कारण समजू शकेल.दरम्यान श्रीक्षेत्र पद्मालय परिसरात सर्वत्र घनदाट जंगल असून प्रेमीयुगलांसाठी सुरक्षित ठिकाण आहे.दररोज या परिसरात शेकडो प्रेमीयुगल येवून अश्लील चाळे करीत असतात.यापूर्वी जंगलात आलेल्या प्रेमीयुगलांना धमक्या देवून लुट केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.स्थानिक पोलिसांनी पद्मालय परिसरात गस्त घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
No comments