विटनेर जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात “मराठी शाळा माझी माय, इतर माध्यमांच्या शाळा माझ्या मावश्या” – शिक्षणाधिकारी निलेश पाटी...
विटनेर जिल्हा परिषद शाळेचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात
“मराठी शाळा माझी माय, इतर माध्यमांच्या शाळा माझ्या मावश्या” – शिक्षणाधिकारी निलेश पाटील
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा:– तालुक्यातील विटनेर येथील जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या तालुकास्तरीय उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावलेल्या या शाळेने जिल्हास्तरावरही अव्वल यावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी पाटील यांनी मराठी माध्यमाच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. “अधिकारी म्हणून सर्वच शाळा मला प्रिय आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा माझी माय आहेत, तर इतर माध्यमांच्या शाळा माझ्या मावश्या आहेत,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिक्षण घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी पालकांना संदेश दिला की, इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक असले तरी मुलांचा भक्कम पाया मातृभाषेतच घालणे अधिक महत्त्वाचे आहे.
शाळेसाठी आधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक, ग्रामस्थ व पालकांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. “ज्या गावाने शाळेकडे लक्ष दिले, त्या गावाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही. मुले पालक व शिक्षकांचे अनुकरण करतात, त्यामुळे दोघांची जबाबदारी अधिक वाढते,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश एकनाथ पाटील होते. मुख्याध्यापक हेमंत भामरे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला. यावेळी विविध मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत विटनेर येथील सर्व सन्माननीय सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत पाटील व श्री. प्रवीण पाटील सर यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती मनीषा पाटील व विकास पाटील यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. एकूणच विटनेर जिल्हा परिषद शाळेचा हा सांस्कृतिक सोहळा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि शिक्षणाविषयी सकारात्मक संदेश देणारा ठरला.

No comments