संतविचारांच्या प्रसारासाठी मुक्ताई फिरता नारळी सप्ताह; न्हावी येथे महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराजांचे आवाहन इदू पिंजारी, फैजपूर (संपाद...
संतविचारांच्या प्रसारासाठी मुक्ताई फिरता नारळी सप्ताह; न्हावी येथे महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराजांचे आवाहन
इदू पिंजारी, फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
देशातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी युवकांना संतविचारांनी सुसंस्कृत करणे अत्यावश्यक आहे. या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहात तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज यांनी केले.
न्हावी येथील नाथ मंदिरात नारळी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्ता सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, संतांच्या विचारांमधून समाजात नैतिक मूल्यांची जपणूक होते आणि युवकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडते. या भक्ती उत्सवात विशेषतः तरुणांसाठी ज्ञानेश्वरी चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला असून आबालवृद्धांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य शरद महाजन यांनी केले. या महोत्सवात अन्नदानासह सर्व प्रकारचे सहकार्य न्हावी ग्रामस्थांकडून करण्यात येईल, अशी ग्वाही देत त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाची रूपरेषा क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी सादर केली.
वारकरी संप्रदायाचे विद्वत रत्न चैतन्य महाराज देगलूरकर व ॲड. जयवंत महाराज बोधले हे तरुणाईचे विशेष प्रबोधन करणार असून महंत रामगिरी महाराज (सराला बेट) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. संपूर्ण कार्यक्रमात जनार्धन हरिजी महाराज व रवींद्र हरणे महाराज यांचे पूर्णवेळ मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या सहकार्याने सर्व परंपरा व पंथातील कीर्तनकार, भाविक व सकल हिंदू समाज तसेच यावल व रावेर तालुक्यातील नागरिकांच्या सहभागातून हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
दि. १६ मार्च रोजी मुक्ताई सिद्ध पादुकांचे मुक्ताईनगर येथून आगमन होऊन उदळी, सावदा, फैजपूर, न्हावी, कलमोडा, खिरोदा, सावखेडा, रोझोदा, चिनावल मार्गे श्री क्षेत्र कुंभारखेडा येथे आगमन होईल. दि. १७ मार्च ते २४ मार्च दरम्यान विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची सविस्तर माहिती नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य के. जी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश बेंडाळे यांनी मानले. सभेला दूध संघ संचालक नितीन चौधरी, शेतकी संघ संचालक धनंजय फिरके, सरपंच देवेंद्र चोपडे, डॉ. प्रमोद पाटील, मुकेश पाटील, उमाकांत मावळे, रविंद्र झोपे, रवींद्र फिरके, विलास भो गे, अनिल लढे, प्रल्हाद बोरोळे, देवेंद्र पाचपांडे, हर्षद महाजन, अतुल तळले, श्याम महाजन, किशोर पाटील तसेच न्हावी, बोरखेडा, कुंभारखेडा, कलमोडा, मारुळ, हिंगोणे, हंबर्डी येथील शेकडो भाविक उपस्थित होते.

No comments