साताऱ्यात ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा उत्स्फूर्त जल्लोष; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती “शिवरायांचे आठवावे रू...
साताऱ्यात ‘जय शिवाजी, जय भारत’ पदयात्रेचा उत्स्फूर्त जल्लोष; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती
“शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप…”
सातारा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत माय भारत (MY Bharat) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथे आयोजित भव्य “जय शिवाजी, जय भारत” पदयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या पदयात्रेला केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत सक्रिय सहभाग नोंदविला.
ही पदयात्रा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता शिवरायांच्या जाज्वल्य विचारांनी प्रेरित असा एक ‘चैतन्य सोहळा’ ठरली. हजारो युवक-युवतींच्या ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रप्रेम, शौर्य आणि स्वाभिमानाची भावना वातावरणात जागृत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
याप्रसंगी शंभुराज देसाई (पालकमंत्री, सातारा), शिवेंद्रसिंहराजे भोसले (मंत्री, महाराष्ट्र राज्य), जयकुमार गोरे (मंत्री, महाराष्ट्र राज्य), आमदार मनोज घोरपडे, सातारा नगरीचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, धैर्यशील कदम, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रमाचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला.
साताऱ्यातील विविध शाळांनी पदयात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. लेझीम पथक, घोडेस्वार पथक, गजी नृत्य, दांडपट्टा, मर्दानी खेळ, मलखांब, आकर्षक चित्ररथ तसेच पारंपारिक वेशभूषा व नृत्य सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी शिवकालीन परंपरेचे प्रभावी दर्शन घडविले. तरुणाईच्या जोशपूर्ण सहभागामुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
शिवरायांचे आदर्श, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत युवा पिढीत रुजविण्यासाठी हा उपक्रम एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शौर्याच्या पाऊलखुणांनी भारलेली ही ऐतिहासिक पदयात्रा साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशी ठरली असून या प्रेरणादायी उपक्रमाचा भाग होण्याचा सर्वांनी अभिमान व्यक्त केला.



No comments