adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील आरोपी शैलेश राठी ताब्यात - मलकापूर पोलिसांची कारवाई; व्यापारी व उद्योजकांना घातला कोट्यवधींचा गंडा

 कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील आरोपी शैलेश राठी ताब्यात - मलकापूर पोलिसांची कारवाई; व्यापारी व उद्योजकांना घातला कोट्यवधींचा गंडा  अम...

 कोट्यवधींची ऑनलाईन फसवणूक प्रकरणातील आरोपी शैलेश राठी ताब्यात

- मलकापूर पोलिसांची कारवाई; व्यापारी व उद्योजकांना घातला कोट्यवधींचा गंडा 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नोकरीचे आमिष, उद्योगव्यवसायात मोठ्या नफ्याचे प्रलोभन आणि ऑनलाईन व्यवहारांची आभासी विश्‍वासार्हता दाखवत उद्योजकांना जाळ्यात ओढणाऱ्या कथित टोळीविरोधातील कारवाईला वेग आला आहे. अनेक व्यापारी व उद्योजकांना लाखो, कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याच्या तक्रारींच्या पार्श्‍वभूमीवर शैलेश लिलाधर राठी याला मलकापूर पोलीस यांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कार्यवाहीसाठी त्याला संगमनेर न्यायालय येथे हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मलकापूर तालुक्यासह राज्यात काही वर्षांपासून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत असल्याची तक्रार व्यापारीवर्गातून सातत्याने होत आहे. शेतकरी, लघुउद्योजक, नवीन व्यवसाय सुरू करणारे तरुण तसेच परराज्यातील व्यावसायिकांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकरणांमधील फसवणूक करणाऱ्यांकडून मोठा नफा, हमखास व्यवहार आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन देत विश्‍वास संपादन केला जातो आणि त्यानंतर माल उचलून देयके थकवली जातात, अशी फसवणूक झालेल्यांची तक्रार आहे.

राठी कुटुंबाशी संबंधित व्यक्तींनी मां सचीया ट्रेडिंग कंपनीच्या नावाने विविध माध्यमांतून संपर्क साधत ऑर्डर घेतल्याचे आरोप आहेत. सुरुवातीला अल्प रक्कम आगाऊ दिली गेली. मात्र, उर्वरित रक्कम देताना टाळाटाळ, धनादेश देणे किंवा संपर्क टाळणे असे प्रकार घडल्याचे अनेक उद्योजकांचे म्हणणे आहे. काहींनी तर वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणातील फसवणुकीमुळे अनेक व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. फसवणूक झालेल्या काहींनी एकत्र येत माहितीची देवाण-घेवाण सुरू केली आहे. इतरांनी व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ऑनलाईन व्यापाराच्या वाढत्या जाळ्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी कडक यंत्रणा उभी करावी, अशी मागणी केली जात आहे.

शिवसेनेची आक्रमक भूमिका

उद्योजक, व्यापारी व शेतकऱ्यांना आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. पीडितांना न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना उबाठाचे नेते दीपक चांभारे पाटील यांनी घेतली आहे. फसवणूक झालेल्यांनी पुढे येऊन तक्रारी नोंदवाव्यात, शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. प्रशासनाने अशा प्रकरणांना गांभीर्याने घेत तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

No comments