मराठीचा अपमान खपवून घेणार नाही; मनविसेचा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला इशारा जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
मराठीचा अपमान खपवून घेणार नाही; मनविसेचा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला इशारा
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी प्रसिद्ध केलेले परिपत्रक क्र. २/२०२६ (दि. ०७/०१/२०२६) तसेच अध्यादेश क्र. १३४ हे केवळ इंग्रजी भाषेत काढण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषेचे राज्य असताना, उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांशी थेट संबंधित असलेले नियम, परिपत्रके व अध्यादेश इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करणे म्हणजे मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय असून हा प्रकार मराठी भाषेचा थेट अवमान असल्याचा ठपका मनविसेने ठेवला आहे. या संदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रा. श्री. योगेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व आपली ठाम भूमिका स्पष्ट शब्दांत मांडली. इंग्रजी भाषेत प्रसिद्ध करण्यात आलेले नियम व अध्यादेश बहुसंख्य विद्यार्थ्यांना समजत नसल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक हक्कांवर गदा येत आहे, असे मनविसेने यावेळी स्पष्ट केले.
विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ परिपत्रक क्र. २/२०२६ व अध्यादेश क्र. १३४ यांची अधिकृत मराठी आवृत्ती प्रसिद्ध करावी, तसेच यापुढे विद्यापीठातील सर्व परिपत्रके, अध्यादेश व अधिकृत पत्रव्यवहार मराठीतच काढावेत आणि विद्यार्थ्यांना सहज समजेल, अशा सोप्या व स्पष्ट मराठी भाषेचा वापर करावा, अशी ठाम मागणी मनविसेच्या वतीने करण्यात आली. या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, याची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी कल्पेश राजेंद्र पवार (जिल्हाध्यक्ष – रावेर लोकसभा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जळगाव) यांच्यासह श्रीकृष्ण मेंगडे (जळगाव उपशहर अध्यक्ष, मनसे), ललित शर्मा, प्रकाश जोशी, उदय पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मराठी माणसाचा आणि मराठी विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी मनसे सदैव रस्त्यावर उतरणार आहे, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments