चोपडा–यावल–रावेर पेसा भरती वादात खळबळ २०१६ व २०२३ मधील वनरक्षक भरतीत बोगस उमेदवारांची निवड? फौजदारी कारवाईची मागणी चोपडा प्रतिनिधी (संपा...
चोपडा–यावल–रावेर पेसा भरती वादात खळबळ
२०१६ व २०२३ मधील वनरक्षक भरतीत बोगस उमेदवारांची निवड? फौजदारी कारवाईची मागणी
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
– चोपडा, यावल व रावेर तालुक्यातील पेसा राखीव क्षेत्रातील २०१६ व २०२३ सालच्या वनरक्षक भरती प्रक्रियेत बेकायदेशीर कागदपत्रांच्या आधारे काही उमेदवारांची निवड झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक आदिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांवर प्रचलित कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर व स्थानिक पातळीवर केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये काही वनरक्षकांच्या जन्मदाखला, शाळा दाखले, पालकांची नावे तसेच मूळ गाव व जन्मठिकाण यामध्ये विसंगती आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. पेसा क्षेत्रासाठी राखीव असलेल्या पदांवर नॉन-पेसा किंवा इतर राज्यातील व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संशयित उमेदवारांची यादी (आरोपानुसार)
१) मनिष खुमसिंग बारेला – नियुक्ती पेसा गाव मोहरद; मूळ गाव डांभूर्णी (नॉन-पेसा)
२) जेकाराम फुलसिंग बारेला – नियुक्ती पेसा गाव मोहरद; मूळ गाव आंबा सिरवेल (मध्यप्रदेश)
३) पिंकी धवलसिंग कोठारी – नियुक्ती पेसा गाव मोहरद; मूळ गाव इस्लामपूर (बुलढाणा)
४) निर्मला रेवलसिंग सस्ते – नियुक्ती पेसा गाव मनापुरी; मूळ गाव इस्लामपूर (बुलढाणा)
५) अनिता लकडा बारेला – नियुक्ती पेसा गाव वाघझिरा; मूळ गाव धुपा सिरवेल (मध्यप्रदेश)
६) पोप्या छत्तरसिंग बारेला – नियुक्ती पेसा गाव कर्जाणे; मूळ गाव माट्यामेल (मध्यप्रदेश)
७) मंगला प्रधान बारेला – नियुक्ती पेसा गाव कर्जाणे; मूळ गाव धामण्या (मध्यप्रदेश)
८) थावरीया लालसिंग बारेला – नियुक्ती पेसा गाव सत्रासेन; मूळ गाव धामण्या (मध्यप्रदेश)
९) दिलीप सुरपान बारेला – नियुक्ती पेसा गाव मेलाने; मूळ गाव खोकरी (मध्यप्रदेश)
१०) रायमल गुमान बारेला – नियुक्ती पेसा गाव मालापुर; मूळ गाव पांजरीया धवली (मध्यप्रदेश)
११) संगीता रिंगण्या बारेला – नियुक्ती पेसा गाव मोहरद; मूळ गाव उमरिया सिरवेल (मध्यप्रदेश)
वरील नावे ही स्थानिक आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या चौकशीअंती निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला असून, २०१६ व २०२३ च्या भरतीतील आणखी काही नावे तपासाधीन असल्याचे सांगण्यात आले आहे.
उच्च न्यायालयात याचिकेची तयारी
या प्रकरणी न्यायालयीन लढाईची तयारी सुरू असल्याचे स्थानिक आदिवासी वकिलांकडून सांगण्यात आले. चोपडा न्यायालयातील ॲड. जे. के. बारेला, ॲड. व्ही. ओ. पावरा तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयातील ॲड. युवराज बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती, नंदुरबार व धुळे तसेच प्रांत कार्यालय फैजपूर व अमळनेर येथे माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागविण्यात आली असून, सुमारे ८५ टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लवकरच संपूर्ण माहिती जाहीर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
भरती प्रक्रियेला स्थगितीची मागणी
सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी व संबंधितांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सर्व स्थानिक आदिवासी कार्यकर्ते, संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन न्यायालयीन लढ्यात वेळ, बुद्धीमत्ता व आर्थिक सहकार्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर आरोपांबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही. अधिकृत तपासानंतरच संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

No comments