अवकाळी पावसाने मलकापूर तालुक्यात हाहाकार; पंचनामे व मदत प्रक्रियेत प्रशासन सुस्त ? अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलका...
अवकाळी पावसाने मलकापूर तालुक्यात हाहाकार; पंचनामे व मदत प्रक्रियेत प्रशासन सुस्त ?
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- तालुक्यातील शेतशिवारात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने अक्षरशः हाहाकार माजवला असून, प्रशासनाची यंत्रणा मात्र अद्याप सुस्त असल्याचे चित्र समोर आले आहे. गुरुवारी रात्री अवघ्या एका तासाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावून घेतला. मात्र, पंचनामे आणि मदतीच्या प्रक्रियेला अजूनही गती मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतात सर्वत्र मका पिके आडवी पडलेली, कणसे जमिनीत रुतलेली दिसून आली. कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे.
यावेळी निलेश नारखेडे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र शब्दांत टीका करत, “अवकाळी संकटानंतर तात्काळ पंचनामे होणे अपेक्षित असताना अधिकारी घटनास्थळी फिरकलेही नाहीत. शेतकरी अडचणीत असताना शासनाची यंत्रणा कागदोपत्रीच का?” असा सवाल उपस्थित केला. तसेच तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, शेतशिवारातील बहुतांश शेतकऱ्यांनी मका व ज्वारी पिकांवर मोठा खर्च केला होता. बियाणे, खते, औषधे व मजुरीसाठी घेतलेले कर्ज आता फेडणे कठीण झाले आहे. उभे पीक वाऱ्याने आडवे पडल्याने उत्पादनात सुमारे ५० ते ७० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे केवळ चालू हंगामच नव्हे तर पुढील पेरणीचे नियोजनही धोक्यात आले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे ठोस मागण्या मांडल्या असून त्यामध्ये तातडीने सर्वेक्षण, प्रति हेक्टर आर्थिक मदत, कर्जमाफी तसेच पुढील हंगामासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असताना शासनाने संवेदनशीलता दाखवून तातडीने मदत करणे गरजेचे असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळू ठाकरे, तालुकाध्यक्ष गोपाल सातव यांच्यासह प्रभाकर तायडे, राजू खंडारे, हरीभाऊ जगदाळे, संजू देशमुख, विनोद हांडगे, ऋषी घाटे, दिलीप घाटे, गोपाल वानखेडे, अमोल सातव, अतुल नाफडे, सरदारसिंग राजपूत, भरतसिंग राजपूत, अनिल राजपूत, संतोष घाटे, अरविंद सानिसे, चक्रधर घाटे, ईश्वर वानखेडे आदी शेतकरी उपस्थित होते.



No comments