रमजान विशेष पालनकर्त्यास (अल्ला) प्रसन्न करण्यासाठी नमाज कायम करा महिनाभर मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवत असून, रात्री रोज 'तहावीह...
रमजान विशेष
पालनकर्त्यास (अल्ला) प्रसन्न करण्यासाठी नमाज कायम करा
महिनाभर मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवत असून, रात्री रोज 'तहावीह'ची नमाज अदा करीत असतात. त्यात 'कुराण'चे तोंडी वाचन मौलवी करतात व महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गरीब, अनाथांना पैशांसह वस्तूच्या रूपाने जकात दिली जाते. इस्लाम व रमजानविषयी विशेष माहिती सर्वांना व्हावी, यासाठी ही मालिका रमजाननिमित्त आम्ही सुरू करीत आहोत. यात पवित्र 'कुराण'मधील 'कुराण सार' सुद्धा आहे. हजरत इब्राहिम यांच्या मशिदीकडे म्हणजेच काबाकडे तोंड करून अल्लाच्या सेवेत पाच वेळा उभे राहावे. त्याच्यासमोर वाकून (रुकू) आपली नम्रता कबूल करावी व मग जमिनीवर डोके टेकून (सिजदा) आपली असहाय्यता प्रकट करावी, यालाच नमाज म्हणतात. ही नमाज सर्व मुस्लिम बांधवांनी एकाच ठिकाणी एकाच वेळी राजा असो की फकीर, गरीब असो की श्रीमंत एकत्र येऊन एकाच धार्मिक नेत्याच्या मागे एकसाथ पढावी. नमाज ही जशी अल्ला व मानव यांच्यामधील आकर्षणाची सर्वांत मजबूत कडी आहे. तसेच ही इस्लामधर्मीयांच्या सामाजिक व्यवस्थेची खरी द्योतक आहे. म्हणजेच सर्वांनी एकत्र यावे. आपापसांतील भेदभाव विसरून एका रांगेत उभे राहावे, एकाच इमामाच्या संकेतावर हालचाल करणाऱ्या संघटित वर्गाचे स्वरूप धारण करावे. यासाठी हजरत मुहम्मदांनी सांगितले आहे, की नमाजसाठी उभे राहताना अगदी पायास पाय लावून उभे राहावे, म्हणजेच लोकांची मनेही याप्रमाणे जुळतील.
इस्लामच्या सर्व आदेशात सर्वांत जास्त महत्त्व नमाजला आहे. त्यासाठी नमाजला धर्माचे खांब म्हणतात. आठवड्याची सामूहिक प्रार्थना शुक्रवारी दुपारी पढण्याबाबत मक्केतच आदेश आला होता. नमाजच्या आधी इमाम ईश्वराची स्तुती कुराणातील आयात (सुरह), शिक्षण, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याची तंबी व समुपदेशाने भरलेले छोटेसे प्रवचन करतात व ईश्वराचा संदेश देतात. अल्लाची प्रार्थना करण्यासाठी व इतर सामाजिक समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक वस्तीत मशिदी उभारण्यात आल्या. या मशिदींना नमाज, सामाजिक व धार्मिक कार्यात सल्ला देण्याची जागा त्यांचे न्यायालय असे विविध रूप देण्यात आले. प्रत्येक इस्लामधर्मीयाला दिवसातून पाच वेळा नमाज पढणे अनिवार्य करण्यात आले.
अब्दुल सरदार पटेल
मो. 8766747092

No comments