ह.भ.प. मनोहर खोंडे सर यांची ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सन्मानपूर्वक निवृत्ती कुंभ अभंगाचा’ ग्रंथ प्रकाशनाने सोहळा ...
ह.भ.प. मनोहर खोंडे सर यांची ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक पदावरून सन्मानपूर्वक निवृत्ती
शिरपूर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥
उत्तर महाराष्ट्र नाभिक समाजाचा बुलंद आवाज, राष्ट्रीय कीर्तनकार व भागवताचार्य ह.भ.प. मनोहर खोंडे सर यांनी दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्याध्यापक पदावरून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर सन्मानपूर्वक निवृत्ती स्वीकारली. शिक्षण, समाजप्रबोधन आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून आला.
निवृत्ती सोहळ्यानिमित्त त्यांच्या लिखित ‘कुंभ अभंगाचा’ या ग्रंथाचे प्रकाशन आदरणीय आप्पासो नीलकंठ गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक) तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कथा, प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे खोंडे सर जेव्हा शिक्षक म्हणून कार्यरत होते, तेव्हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीतही त्यांनी मोलाचा वाटा उचलला. शिस्त, संस्कार आणि समाजनिष्ठा यांचे धडे देत त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या.
या प्रसंगी उपस्थित नातेवाईक, जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक अधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या भाषणातून खोंडे सर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यतत्परतेचा, साधेपणाचा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचा सर्वांनी विशेष उल्लेख केला.
निवृत्ती म्हणजे जीवनाची नवी आवृत्ती. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय अनुभवाच्या बळावर आयुष्याच्या दुसऱ्या पर्वातही त्यांना मोठे कार्य करण्यासाठी ईश्वरशक्ती लाभो, हीच सर्वांची प्रार्थना.
शुभेच्छुक
जगदीश बोरसे व परिवार


No comments