लाचखोराला एसीबीचा सापळा..!१२ हजारांची मागणी पण ७ हजार घेताना सेतूवाला पकडला रंगेहात.. अहिल्यानगर (प्रतिनिधी):- (संपादक :- हेमकांत गायकवाड)...
लाचखोराला एसीबीचा सापळा..!१२ हजारांची मागणी पण ७ हजार घेताना सेतूवाला पकडला रंगेहात..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ने नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करत गणेश कचरू घोरपडे (वय ३९) रा.नेवासा) याला ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.या प्रकरणामुळे नेवासा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेल्या नेवासा बुद्रुक येथील मिळकत ०.८० जमिनीचा फेरफार रद्द करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून काम करून देण्याच्या बहाण्याने गणेश घोरपडे (धंदा – सेतू व्यवसाय, गणेश मल्टी सर्व्हिसेस,रा.भेंडा) याने तक्रारदाराकडे १२ हजार रुपयांची लाच मागितली होती.
यापैकी ७ हजार रुपये आगाऊ देण्याची मागणी करण्यात आली होती.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
त्यानुसार ४ मार्च २०२६ रोजी नेवासा खुर्द येथील गणेश मल्टी सर्व्हिसेस कार्यालयात एसीबीने सापळा रचला.या कारवाई दरम्यान गणेश घोरपडे याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले.
या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीमती छाया देवरे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर) यांच्या पथकाने केली. तसेच पोलीस हवालदार गुलाब पवार आणि सचिन नामभाऊ सुंठक यांनी पंच म्हणून काम पाहिले.
या कारवाईला पोलीस अधीक्षक भारत तांबे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र), अपर पोलीस अधीक्षक माघव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरित्या अंजाम दिला.

No comments