आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशव्यापी ‘अस्मिता लीग’चे आयोजन २५० ठिकाणी एकाच दिवशी ॲथलेटिक्स स्पर्धा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षात...
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशव्यापी ‘अस्मिता लीग’चे आयोजन
२५० ठिकाणी एकाच दिवशी ॲथलेटिक्स स्पर्धा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची घोषणा
मुंबई / जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आंतरराष्ट्रीय महिला दिन (८ मार्च) निमित्त देशभरात २५० ठिकाणी एकाच दिवशी भव्य ॲथलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयामार्फत करण्यात आली आहे. ‘अस्मिता’ (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) या उपक्रमांतर्गत ही लीग स्पर्धा राबविण्यात येणार असून हा उपक्रम Khelo India आणि My Bharat यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री Raksha Khadse यांनी दिली.
८ मार्च रोजी देशातील विविध राज्यांतील २५० केंद्रांवर एकाच वेळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतील. या देशव्यापी उपक्रमात सुमारे २ लाख ५० हजार महिलांचा सहभाग अपेक्षित आहे.
‘अस्मिता लीग’ची सुरुवात २०२१ मध्ये झाली. आजपर्यंत देशातील ५५० हून अधिक जिल्हे व ७०० शहरांमध्ये ३४ क्रीडा प्रकारांमध्ये २६०० पेक्षा अधिक लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या आहेत. या स्पर्धांमध्ये ३ लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला असून ईशान्येकडील राज्यांसह दुर्गम भागांपर्यंत या उपक्रमाचा विस्तार झाला आहे.
ग्रामीण व लहान शहरांतील मुलींनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर घडवावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम माननीय पंतप्रधान Narendra Modi यांच्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असल्याचेही नमूद करण्यात आले. तसेच आगामी Commonwealth Games आणि Olympic Games यांच्या पार्श्वभूमीवर देशातील क्रीडा व्यवस्थापन क्षमता बळकट करण्यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. महिला सक्षमीकरणाला चालना देत क्रीडा क्षेत्रातील व्यापक सहभाग वाढविण्यासाठी ‘अस्मिता लीग’ ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केला.


No comments