आदिवासी विकास परिषदेत पेसा कक्षाचा सल्ला व मार्गदर्शन स्टॉल; शाश्वत विकासाच्या ७ संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम आयुक्त...
आदिवासी विकास परिषदेत पेसा कक्षाचा सल्ला व मार्गदर्शन स्टॉल; शाश्वत विकासाच्या ७ संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम 
आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वर्डी (ता. चोपडा), दि. ३ मार्च २०२६ — अशोकजी वुईके, मंत्री आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान वर्डी येथे आयोजित “आदिवासी विकास परिषद” उत्साहात पार पडली. परिषदेत जिल्हा परिषद जळगावच्या पेसा कक्षामार्फत सल्ला व मार्गदर्शन केंद्र (स्टॉल) उभारण्यात आला होता.
मा. मिनलजी करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव तसेच मा. भाऊसाहेब अकलाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) तथा नोडल अधिकारी – पेसा यांच्या मार्गदर्शनाखाली बोरमळी व वर्डी (ता. चोपडा) येथे हा स्टॉल उभारण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी स्टॉलला सदिच्छा भेट देत पेसा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
यावेळी मंत्री महोदयांसह आयुक्त, आदिवासी विकास विभाग (नाशिक) व प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यालय (यावल) यांना पेसा कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. प्रदीप बाविस्कर, तालुका व्यवस्थापक (रावेर) श्री. युनूस तडवी व तालुका व्यवस्थापक (चोपडा) श्री. शरद सपकाळे यांनी जिल्ह्यातील पेसा कामकाजाची सविस्तर माहिती दिली. तसेच माहिती पुस्तिका व वाचन साहित्य प्रदान करण्यात आले.
विशेष म्हणजे पेसा कायद्याच्या शाश्वत विकासावर आधारित सात महत्त्वपूर्ण संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सात संकल्पनांमध्ये ग्रामसभेचे बळकटीकरण, कर्ज देण्यावर नियंत्रण, किरकोळ वनउत्पादन व्यवस्थापन, गौण खनिजांवरील नियंत्रण, जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण रोखणे, विवाद निवारणाची पारंपरिक पद्धत आणि मादक पदार्थांच्या विक्री व सेवनावर नियंत्रण यांचा समावेश आहे.
मंत्री महोदयांनी पेसा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामकाजाचे कौतुक करत ते अधिक प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे परिषदेला उपस्थित नागरिकांना पेसा कायद्याबाबत सविस्तर माहिती मिळाली असून जिल्हा परिषद जळगावच्या पेसा कक्षाच्या कार्याची व्यापक दखल घेतली जात आहे.
— पेसा कक्ष, जि. प.


No comments