adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

उगवतीचे रंग नृत्य उत्सवात आई-मुलांचा भावनिक संगम; पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा....

 उगवतीचे रंग नृत्य उत्सवात आई-मुलांचा भावनिक संगम;   पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा....  चोपडा प्रतिनिधी  (संपादक ...

 उगवतीचे रंग नृत्य उत्सवात आई-मुलांचा भावनिक संगम;   पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.... 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बालसंस्कार केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त ‘उगवतीचे रंग’ या विशेष नृत्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून मातृशक्तीचा गौरव करत आई-पाल्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक नात्याचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात विभागप्रमुख मीना माळी  यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी महिलांचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र घडविण्यातील अनन्यसाधारण योगदान अधोरेखित केले. ‘उगवतीचे रंग’ ही संकल्पना आई-मुलांमधील शब्दापलीकडील नाते नृत्याच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी राबविण्यात आली असून हा कार्यक्रम केवळ कला सादरीकरण न राहता भावनांचा सुंदर उत्सव ठरल्याचे त्यांनी सांगितले. 


कार्यक्रमाच्या उद्घाटक वैद्य  प्राजक्ता महाले (आयुर्वेदाचार्य, आहार तज्ञ व गर्भसंस्कार तज्ञ) यांनी आपल्या मार्गदर्शनात सात्विक आहाराचे महत्त्व अधोरेखित करत गाईचे तूप, पालेभाज्या, तसेच गणपती स्तोत्र व गायत्री मंत्राचा नियमित जप यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे सांगितले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज बोरोले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली बोरोले उपस्थित होत्या. 


मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील  यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असे व्यासपीठ महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता स्वतःची ओळख निर्माण करत आत्मविश्वासाने व आनंदाने जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. “आजचा कार्यक्रम म्हणजे महिला सन्मान, कुटुंबप्रेम आणि संस्थेच्या संस्कारप्रधान वाटचालीचा त्रिवेणी संगम आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमात आदिवासी नृत्य, गणेश वंदना, रिमिक्स सॉंग तसेच छत्रपती शिवरायांवरील गीतांवर महिला पालक आणि विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य सादर केले. महिला शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची रंगत वाढवली. सर्व सहभागींचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 


समारोप प्रसंगी मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील यांनी मातृशक्तीला वंदन करत सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला सन्मान, कुटुंबप्रेम आणि संस्कारक्षम शिक्षण यांचा सुंदर मिलाफ घडवणारा ‘उगवतीचे रंग’ हा कार्यक्रम उपस्थितांसाठी आगळावेगळा आणि अविस्मरणीय ठरला. 



No comments