धरणगाव तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी सेवा शिबिर धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव : समग्र शिक्षा अंतर्गत स...
धरणगाव तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी सेवा शिबिर
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव : समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून गट साधन केंद्र, पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या वतीने शून्य ते अठरा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्पीच थेरपी, फिजिओथेरपी व ऑक्युपेशन थेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी तालुक्यातील सर्व माध्यमांच्या तसेच विविध व्यवस्थापनांच्या शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या शिबिरात दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या विविध थेरपी सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी थेरपीचे महत्त्व, योग्य व्यायाम पद्धती तसेच घरी पालकांनी विद्यार्थ्यांची कशी काळजी घ्यावी याबाबतही माहिती देण्यात आली.
फिजिओथेरपीसाठी विद्यार्थ्यांची तपासणी यश हेल्थ केअर सेंटर अँड पॉली क्लिनिक, धरणगाव येथे करण्यात आली. यावेळी डॉ. यश ओसवाल व डॉ. अश्विन कोल्हे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तसेच सिस्टर पूजा नेतकर यांनी विद्यार्थ्यांची नोंदणी करून शिबिराच्या आयोजनात सहकार्य केले.
स्पीच थेरपीचे मार्गदर्शन श्री. रोहन पवार (मूकबधिर विद्यालय, धरणगाव) यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बोलण्यातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध पद्धती व सराव प्रकार याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. या शिबिराच्या माध्यमातून संदर्भित विद्यार्थ्यांना पुढील काळात विविध सेवा व सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
सदर शिबिर स्थळी तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित करत पालकांचे मनोबल वाढविण्यासाठी समुपदेशन केले. यावेळी धरणगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र सैंदाणे, जिल्हा समन्वयक राहुल चौधरी व केंद्रप्रमुख विकास पाटील (झुरखेडा) यांनीही शिबिरास भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समावेशित शिक्षण तज्ञ श्री. तुळसिराम सैंदाणे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष शिक्षक दीपक पाटील, अनिल पाटील, नरेंद्र चौधरी, उमेश पाटील, राहुल वाणी, सविता शिंदे, भारती ठाकरे व संगीता वाघ यांनी सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य केले.
या उपक्रमामुळे तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक थेरपी सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली असून पालकांमध्येही समाधान व्यक्त करण्यात आले.



No comments