पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा : पंकज ग्ल...
पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा : पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे दोन दिवस भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी आयोजित या समारंभाला पालक व मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला पंकज शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले, अध्यक्ष पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, संचालक गोकुळ भोळे, सौ. हेमलताताई बोरोले व सौ. दिपालीताई बोरोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली असून त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आर. ए. पोद्दार मेडिकल कॉलेज, मुंबई येथे कार्यरत व नुकतेच २४ फेब्रुवारी २०२६ रोजी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले मेडिकल ऑफिसर डॉ. कपिल पाटील, डॉ. नीलिमा चौधरी (असोसिएट प्रोफेसर, पंचकर्म विभाग, आरबी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, आग्रा), निवृत्त आर्मी ऑफिसर संतोष माळी, भरत राठोड, चोपडा नगरपालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर मिसर, चोपडा तालुक्याचे पीएसआय सचिन चौधरी, नगरसेवक प्रवीण सदाशिव देशमुख, एमएसईबीचे अभियंता संदीप महाजन, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अॅड. रुपेश पाटील, भौतिकशास्त्र तज्ञ प्रकाश देशमुख, गोपाल बारेला, शुभांगी पाटील, दीपेश बडगुजर, कविता कोळी तसेच शाळेचे प्राचार्य मिलिंद पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या समारंभात शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिके प्रदान करण्यात आली. क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर व ब्राँझ पदकांनी सन्मानित करण्यात आले.
समारंभाचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिवप्रेमी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पीएचडी संशोधन करीत असलेले संकेत गांगुर्डे यांनी भरवलेले ऐतिहासिक प्रदर्शन होय. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पालक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आजच्या काळात पाठ्यपुस्तकांमधील इतिहास कमी होत असताना अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्याबद्दल पालकांनी शाळेचे विशेष कौतुक केले. संकेत गांगुर्डे यांनी देखील विद्यार्थ्यांना व पालकांना शिवचरित्राविषयी प्रेरणादायी माहिती देऊन त्यांना उत्साहित केले.
प्रमुख पाहुणे डॉ. कपिल पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी जीवनात संघर्षाला घाबरू नये, अपयश स्वीकारून त्यातून शिकत पुढे गेल्यास यश निश्चित मिळते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश बोरोले यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शुभांगी पाटील व स्वाती शिंदे यांनी केले. तसेच इयत्ता नववीतील विद्यार्थिनी दिव्या महाजन, तनिष्का महाजन, देवयानी चोले, दिशा पाटील, दर्शली पाटील आणि स्वराली चौधरी यांनीही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शाळेच्या समन्वयक उपमा जयस्वाल, शारदा अहिरे, स्वाती सोनवणे व प्रीती पाटील या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments