कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी! वाघोलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धांचा थरार सुरू वेळुंजे गावचे बाळू बोडके यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माऊल...
कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी! वाघोलीत महाराष्ट्र केसरी स्पर्धांचा थरार सुरू
वेळुंजे गावचे बाळू बोडके यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माऊली जमदाडे यांना पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश
जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्र केसरी २०२६ च्या स्पर्धेमध्ये डोळ्याचे पारणे फेडणारी कुस्ती पार पडली महान भारत केसरीचा किताब मिळवणाऱ्या माऊली जमदाडेचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे गावचा बाळू बोडके यांनी पराभव केला.
'महाराष्ट्र केसरी' किताबाचे दावेदार समजले जाणारे कुस्तीगीर ज्ञानेश्वर जमदाडे, विशाल बनकरचे आव्हान गुरुवारी संपुष्टात आले, तर महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांनी विजयी सलामी दिली.
बंडू येवले हरिश मालुसरे अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत सुरू आहे. महाराष्ट्र केसरी गटातील माती विभागात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पहिल्या फेरीत सोलापूरच्याच विशाल बनकरचा ६-१ असा पराभव केला. यानंतर अमरावतीच्या ज्ञानेश्वर जमदाडे याला कमी उंचीच्या आणि महाराष्ट्रातील कुस्तीत चपळ चित्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या बाळू बोडके याने अत्यंत चुरशीच्या लढतीत १०-५ अशा गुणाधिक्याने पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
संपूर्ण देशात आपल्या कुस्ती कौशल्याने धुमाकूळ घालणाऱ्या आणि हिंगोलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिकंदर शेखने पहिल्या फेरीत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून पुण्याच्या अनिकेत मांगडेचा ८-१ असा पराभव केला. यानंतर कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेने ठाण्याच्या कुमार पाटीलचा ६-०, सोलापूरच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या तेजस मोरेचा १२-०, रत्नागिरीच्या संतोष दोरवडने पिंपरी-चिंचवडच्या समाधान दगडेचा १०-० असा पराभव केला. पुण्याच्या सागर देवकातेने यवतमाळच्या शुभम जाधवला चीतपट केले.
महाराष्ट्र केसरी गटात गादी विभागातील पहिल्या फेरीत मूळचा पुण्याचा; पण वाइल्ड कार्डच्या माध्यमातून नांदेडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या प्रतीक जगतापचा १०-० अशा गुणाधिक्याने पराभव करून विजय सलामी दिली. कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने पालघरच्या वैभव मानेचा १०-०, तर नाशिकच्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर याने मूळचा पुण्याचा; पण बीडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतीक देशमुखचा १०-०, तर गत वेळचा महाराष्ट्र केसरी पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा पृथ्वीराज मोहोळ याने जालन्याच्या अरुण चरावडेचा १०-० अशा गुणाधिक्याने पराभव केला. गडचिरोलीच्या संग्राम पाटीलने वाशिमच्या आदित्य मोहोळचा ७-३ असा पराभव केला, तर साताऱ्याच्या दिग्विजय जाधवने जळगावच्या स्वप्नील पाटीलला चीतपट केले. पुणे शहराच्या श्रेयस होळकरने कोल्हापूरच्या ओंकार पाटीलचा ११-० असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

No comments