मार्चमध्येच अनेर झाली कोरडी उन्हाच्या झळा तीव्र; उपाययोजना करण्याची मागणी ■ मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
मार्चमध्येच अनेर झाली कोरडी उन्हाच्या झळा तीव्र; उपाययोजना करण्याची मागणी
■ मच्छिंद्र रायसिंग गलंगी ता. चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी (ता. चोपडा), ता. 17: वातावरणात आतापासूनच उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्याने या भागातून वाहणार अनेक नदी कोरडीठाक पडू लागली आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह गुरांचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच योग्य त्या उपायोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. अनेर नदी सातपुड्यातून वाहत येऊन पिळोदे (ता. शिरपूर) येथे तापी नदीपात्राला मिळते. या नदीवर गणपूर गावाजवळ १९७४ ते ७८ दरम्यान धरणाची निर्मिती झाली. या धरणाचे दरवाजे १५ ऑगस्टला बंद झाल्यानंतर नदीपात्रातून ठराविक पाणी वाहत राहते.
मात्र, यावर्षी हे पाणी धरणाच्या पात्रापासून चार-पाच किलोमीटरपर्यंत पाणी वाहिले. पुढे अनेर (गलंगी) थांब्याजवळ नदी मार्च मध्येच कोरडी झाली आहे. यामुळे परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या आणि शेतीसाठीच्या पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होण्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहेत. अनेर नदीचे पात्र अनेर धरणापासून गणपूर, भवाळेपर्यंत जेमतेम वर्षभर चालते. मात्र, पुढे ते उन्हाची तीव्रता जाणवू लागते तसे नदीपात्र कोरडे होत चालते. यावर्षी मार्च महिन्यामध्येच भवाळेपासूनच्या नदीपात्रात डबके दिसू लागले आहे. गलंगी गावापासून पुढील भागात नदी फेब्रुवारी महिन्यातच लुप्त झाली आहे. उन्हाळ्यापूर्वीच नदी कोरडी होऊ लागल्याने पुढील काळात चोपडा व शिरपूर तालुक्याच्या नदीलगतच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या, पाणीपुरवठा योजना व नदीकाठच्या विहिरी व कुपनलिका आणि गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या उभी ठाकली आहे. यावर्षी मार्चमध्येच नदी कोरडी होऊ लागल्याने येणाऱ्या पाणीटंचाईची चाहूल आतापासूनच लागली आहे. या नदीवर बंधारे बांधण्याची गरज असून पाच पाच किलोमीटरच्या अंतरावर कोल्हापूर पद्धतीचे किंवा थोडे मोठ्या प्रमाणात भक्कम सिमेंट बांध झाल्यास नदीपात्रात उन्हाळ्यातही पाणी टिकून राहणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी चोपडा व शिरपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी ही बाब गांभीयनि घेणे गरजेचे झाले आहे.

No comments