फैजपूर येथे जे.टी.महाजन पॉलिटेक्निक, कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील जे. टी. महाजन प...
फैजपूर येथे जे.टी.महाजन पॉलिटेक्निक, कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील जे. टी. महाजन पॉलिटेक्निक, न्हावी मार्ग येथे विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कॅम्पस ड्राईव्ह 2025-26 यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमात नामांकित मरेली मदरसंन ऑटोमोटिव्ह लाइटिंग इंडिया कंपनीने सहभाग घेत विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. या कॅम्पस ड्राईव्हमध्ये एकूण 47 विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. कंपनीच्या प्रतिनिधींनी लेखी परीक्षा व मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया पार पाडली. तसेच काही उमेदवारांची ऑनलाइन मुलाखत Microsoft Teams द्वारे बुधवार, दि. 18 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात आली. ही प्रक्रिया कंपनीचे प्रतिनिधी विशाल खेडकर (मानव संसाधन विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
निवड प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य व आत्मविश्वास या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे तत्काळ ऑफर लेटर देण्यात आले असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य पी. एम. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर ए. एस. कोळी यांच्या समन्वयाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पॉलिटेक्निकमधील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सक्रिय सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे व सहसचिव शशिकांत चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य राणे यांनीही विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधींचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे मत व्यक्त केले. पॉलिटेक्निक प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये करिअर घडविण्याची संधी मिळत असून, परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments