यावल पंचायत समितीवर गंभीर आरोप; सहा महिन्यांपासून कारवाई नाही, तीव्र आंदोलनाचा इशारा.. यावल प्रतिनिधी : राहुल जयकर (संपादक :- हेमकांत गायकव...
यावल पंचायत समितीवर गंभीर आरोप; सहा महिन्यांपासून कारवाई नाही, तीव्र आंदोलनाचा इशारा..
यावल प्रतिनिधी : राहुल जयकर
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल : जनहित व लोककल्याणाच्या प्रश्नावर दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनावर तब्बल सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने यावल पंचायत समिती प्रशासनावर गंभीर आरोप करण्यात येत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार पंचायत समिती कार्यालय राज्य शासनाच्या नियमांचे योग्य पालन करत नसून सामान्य नागरिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विविध शासकीय योजना व विकासकामांच्या संदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करूनही कोणतीही समाधानकारक माहिती मिळालेली नाही. उलट “तुमच्याकडून जे होईल ते करा” असे उत्तर देत तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच शिक्षण विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग आणि अभियंता शाखेतील अधिकाऱ्यांची भूमिकाही निष्क्रिय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या आदेशालाही यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुषा गायकवाड यांनी केराची टोपली दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गटविकास अधिकाऱ्यांवर कुणाचे राजकीय वरदस्त आहे का? असा संतप्त सवालही सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच गटविकास अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने “सीईओ यांचेच वरदस्त आहे का?” असा थेट प्रश्न राष्ट्रवादीचे उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, येत्या सात दिवसांत योग्य ती कारवाई करून संबंधित प्रकरणाची माहिती देण्यात आली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष योगेश पाटील, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष प्रेम देवरे, गोलू महाजन, किरण महाजन, रोहित महाजन, वैभव कोळी, गोलू कोळी, योगेश कोळी, जुनेद खान, अल्तमस शेख तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


No comments