स्थायी सभापतीपदी सुभाष लोंढे, महिला बालकल्याणच्या सभापतीपदी दिपाली बारस्कर, उपसभापतीपदी वर्षा सानप! सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...
स्थायी सभापतीपदी सुभाष लोंढे, महिला बालकल्याणच्या सभापतीपदी दिपाली बारस्कर, उपसभापतीपदी वर्षा सानप!
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. दोन्ही समित्यांच्या पदांसाठी प्राप्त अर्जावर मंगळवारी (१० मार्च) होणाऱ्या विशेष सभेत प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला स्थायी समिती व त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, दोन्ही समित्यांच्या तिन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
स्थायी समितीच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक सुभाष लोंढे यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिवांकडे सादर केला. या पदासाठी केवळ सुभाष लोंढे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या या उमेदवारी अर्जावर नगरसेवक मनोज कोतकर हे सूचक आहेत. तर, निखिल वारे हे अनुमोदक आहेत.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. सभापती पदासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपाली नितीन बारस्कर यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. त्यांच्या या अर्जाला सुनीता किसन भिंगारदिवे या सूचक, तर अनिता विपुल शेटिया या अनुमोदक आहेत. तसेच, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपच्या वर्षा रोहन सानप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जावर वंदना विलास ताठे या सूचक आणि रोशनी आकाश त्र्यंबके या अनुमोदक आहेत. या दोन्ही पदांसाठीही अन्य कोणतेही अर्ज आलेले नाहीत.
स्थायी समितीचे सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती या तिन्ही महत्त्वाच्या पदांसाठी केवळ एकेकच अर्ज दाखल झाले असले, तरी निवडणूक कार्यक्रमानुसार विशेष सभेत निवडीची प्रक्रिया पार पडेल. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली सभेत प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

No comments