अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश; सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ०१, इगतपुरी प्रकरणाची चौकशी सुरू नाशिक /जळगांव प्रतिनिध...
अपूर्ण माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश; सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ०१, इगतपुरी प्रकरणाची चौकशी सुरू
नाशिक /जळगांव प्रतिनिधी
माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीबाबत अपूर्ण माहिती दिल्याच्या तक्रारीवरून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले आहेत.या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र. ०१, इगतपुरी येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय,नाशिक येथील सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग,नाशिक येथील मुख्य अभियंत्यांना पत्र पाठविले आहे.पत्रकार तथा ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना,जळगाव जिल्हाध्यक्ष हेमकांत बळीराम गायकवाड यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहितीबाबत अपूर्ण माहिती देण्यात आल्याची तक्रार १८/०१/२०२६ रोजी ई-मेलद्वारे विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली होती.
या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित प्रकरणातील सर्व मुद्द्यांचे परीक्षण करून नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.०१,इगतपुरी येथील सहाय्यक जन माहिती अधिकारी व शाखा अभियंता यांच्या कार्यपद्धतीची तपासणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भातील पत्रावर उप आयुक्त (सामान्य प्रशासन) अरविंद लोखंडे यांनी डिजिटल स्वाक्षरी करून आदेश जारी केले असून केलेल्या कारवाईचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यास सांगितले आहे.
दरम्यान,माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेल्या माहितीबाबत अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत असून या प्रकरणाकडे प्रशासनिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments