हातमजुरी करणाऱ्या मजुराचा सुपुत्र पोलीस दलात; मंगेश मंडवेचे प्रेरणादायी यश प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) “परि...
हातमजुरी करणाऱ्या मजुराचा सुपुत्र पोलीस दलात; मंगेश मंडवेचे प्रेरणादायी यश
प्रा. सतीश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
“परिस्थिती नाही, तर जिद्द तुमचं भविष्य घडवते,” याचं जिवंत उदाहरण म्हणजे गलवाडा (ता. मुक्ताईनगर) येथील मंगेश संतोष मंडवे होय. अत्यंत सामान्य कुटुंबातून पुढे येत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्याने जळगाव पोलीस दलात भरती होऊन गावाचं नाव उज्ज्वल केलं आहे.
मंगेशच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचं वातावरण निर्माण झालं असून, सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या मंगेशने आयुष्यातील अडचणींना कधीही शरण न जाता त्यांना आपल्या ध्येयामध्ये रूपांतरित केलं. आई-वडील हातमजुरी करून उदरनिर्वाह करत असताना, शिक्षणाची ओढ आणि काहीतरी मोठं करण्याची जिद्द त्याने कायम जपली.
वडील संतोष मंडवे यांनी काबाडकष्ट करून मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. साध्या परिस्थितीत राहूनही त्यांनी मुलाच्या स्वप्नांना बळ दिलं आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
मंगेशने केवळ शिक्षणावर भर न देता शारीरिक तयारी, वेळेचं नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर पोलीस भरतीसारखी कठीण स्पर्धा यशस्वीरित्या पार केली.
त्याचा संघर्ष आजच्या युवकांसाठी आदर्श ठरत आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा,” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश त्याने आपल्या कृतीतून साकार केला आहे.
मंगेशचं हे यश केवळ वैयक्तिक नसून, प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्नं पाहणाऱ्या प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी ठरत आहे. गावकऱ्यांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत. मंगेशच्या आई-वडिलांच्या जिद्दीला, त्याला आणि संपूर्ण कुटुंबाला सर्वजण सलाम करत आहेत.

No comments