राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “हे विश्व तरी केवढे...?” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञानदिनानिमित्त विशेष ...
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “हे विश्व तरी केवढे...?” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान
नूतन मराठा महाविद्यालयात विज्ञानदिनानिमित्त विशेष उपक्रम
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून नूतन मराठा महाविद्यालयाच्या सायन्स असोसिएशनतर्फे बोस सभागृहात “हे विश्व तरी केवढे...?” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून होमी भाभा संशोधन केंद्र येथील ज्येष्ठ वैज्ञानिक अधिकारी तसेच खगोलशास्त्र ऑलिंपियाड विभागाचे मार्गदर्शक श्री. आनंद घइसास उपस्थित होते.
व्याख्यानादरम्यान बोलताना श्री. घइसास यांनी विश्वाच्या अफाट विस्ताराची प्रभावी आणि शास्त्रीय मांडणी केली. पृथ्वी ते सूर्य यांतील सुमारे १५ कोटी किलोमीटर अंतराला “खगोलीय एकक” (Astronomical Unit) असे म्हणतात, असे सांगून त्यांनी पुढील अंतर मोजण्यासाठी “प्रकाशवर्ष” या एककाचा वापर कसा केला जातो हे स्पष्ट केले. एका वर्षात प्रकाश जितके अंतर पार करतो ते एक प्रकाशवर्ष होय. आपल्या सर्वात जवळचा तारा ‘मित्र’ किंवा Proxima Centauri हा सुमारे 4.24 प्रकाशवर्ष अंतरावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
अनेक ताऱ्यांच्या समूहातून आकाशगंगा तयार होते आणि आपल्या आकाशगंगेत शेकडो अब्ज तारे असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाशात अशा असंख्य आकाशगंगा अस्तित्वात असून, त्यांच्या अंतराची मोजणी “पार्सेक” या एककात केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
व्याख्यानात त्यांनी केवळ विशाल अंतरांचा आढावा घेतला नाही, तर सूक्ष्म जगतातील प्रवासही उलगडून दाखवला. नॅनोमीटरपासून ते न्यूट्रॉन आणि प्रोटॉनसारख्या सूक्ष्म कणांपर्यंतचा प्रवास सांगत, “जे सूक्ष्मात आहे तेच अनंतात आहे आणि जे अनंतात आहे तेच सूक्ष्मात आहे” हा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडला. विश्व अतीसूक्ष्म ते अफाट अनंत आहे आणि त्याचा संपूर्ण थांग मानवाला अद्याप लागलेला नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. माधुरी पाटील या होत्या. व्यासपीठावर श्री. साहेबराव पाटील (स्व. दादासाहेब खूशाल देवराम पाटील फाउंडेशनचे उपाध्यक्ष), उपप्राचार्य के. बी. पाटील तसेच सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कमरीन शेख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. विशाल तेली यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. बावस्कर मॅडम यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत व्याख्यान अधिक संवादात्मक केले. सादर करण्यात आलेल्या PPT मधील चित्रफिती, आकाशगंगांची छायाचित्रे आणि तुलनात्मक मोजमापांमुळे विद्यार्थ्यांना विश्वाच्या अफाट विस्ताराची स्पष्ट जाणीव झाली. हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि विज्ञाननिष्ठ विचारांना चालना देणारे ठरले.



No comments