adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही; न्यूनगंड सोडणे गरजेचे – व्याख्याते रामचंद्र पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेत ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके’ व्याख्यानमालेत अभ्यासपूर्ण मांडणी

मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही; न्यूनगंड सोडणे गरजेचे – व्याख्याते रामचंद्र पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेत ‘माझ्या मराठीच...

मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही; न्यूनगंड सोडणे गरजेचे – व्याख्याते रामचंद्र पाटील

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेत ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके’ व्याख्यानमालेत अभ्यासपूर्ण मांडणी 


चोपडा प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : भाषा माणसाला माणसाशी जोडण्याचे संपन्न साधन असून मानवी संस्कृती टिकवून ठेवण्याचे महान कार्य भाषेमुळेच शक्य होते. गेल्या दोन हजार वर्षांहून अधिक काळापासून हे कार्य आपल्या माय मराठीने समर्थपणे पार पाडले आहे. मराठी भाषा कधीही नष्ट होणार नाही; मात्र मराठी माणसाने न्यूनगंड सोडणे आवश्यक आहे, असा ठाम विश्वास जळगाव येथील व्याख्याते रामचंद्र पाटील यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या चोपडा शाखेतर्फे आयोजित ‘मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला’ या उपक्रमातील दुसरे पुष्प गुंफताना ते पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात बोलत होते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके’ या विषयावर त्यांनी मराठीच्या गौरवशाली परंपरेचा विस्तृत आढावा घेतला. आपल्या भाषेची प्राचीनता, मौलिकता, अखंडता आणि स्वयंभूपण ही वैशिष्ट्ये अधोरेखित करताना पाटील म्हणाले, दरवर्षी मराठीत सुमारे दोन हजार पुस्तके व पाचशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. याशिवाय वर्षभरात विविध स्तरांवर २०० हून अधिक मराठी साहित्य संमेलने आयोजित केली जातात. जगातील ७२ देशांत मराठी भाषा बोलली जाते आणि सुमारे ८३ दशलक्ष मराठी भाषिक जगभर विखुरलेले आहेत. भारतात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठीत सुमारे ४० बोलीभाषा आहेत. सातवाहनांच्या दरबारात मराठीची घुमणारी ध्वनी ऐकू येत होती आणि यादवांच्या राजाश्रयात ती अधिक फुलली. ‘लीळाचरित्र’सारख्या ग्रंथातून मराठी साहित्य यात्रेची सुवर्णपाने उलगडली. संत साहित्याने मराठी मनाचा कणा ताठ करत समाजजागृती साधली. महानुभाव पंथाने मराठीला धर्मभाषेचा मान मिळवून दिला. जगात अनेक भाषांत राष्ट्रगीते लिहिली गेली; मात्र मराठीत ‘पसायदान’च्या रूपाने विश्वगीत रचले गेले, असे ते म्हणाले.

राष्ट्राची भाषा संपवली तर संस्कृती नष्ट करता येते, हा विचार मनात ठेवून लॉर्ड मेकॉलेने भारतात शिक्षणपद्धती राबवली, असे सांगत पाटील यांनी भाषिक स्वाभिमान जपण्याचे आवाहन केले. परकीय आक्रमक केवळ शस्त्रांच्या जोरावर राज्य करत नाहीत, तर ते आपली भाषा व संस्कृतीही लादतात; त्यामुळे अनेक भाषा काळाच्या ओघात लोप पावल्या. तरीही मराठीने सर्व आघात सहन करून आपले अस्तित्व टिकवले, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मान्यवरांची उपस्थिती या व्याख्यानमालेचे प्रायोजक जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, रोटरी क्लबचे अध्यक्ष आशिष जयस्वाल, मानद सचिव विश्वास दलाल व शशिकांत पाटील (वढोदा) होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे कार्याध्यक्ष विलास पं. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पवन लाठी यांनी, वक्त्यांचा परिचय कार्यवाह गौरव महाले यांनी तर आभार प्रदर्शन तुषार लोहार यांनी केले. या प्रसंगी डॉ. विकास हरताळकर, डॉ. सुरेश बोरोले, शाखाध्यक्ष अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्यासह श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments