जूनमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महापुराची शक्यता — भेंडवळ घटमांडणीतून वर्षभराचा अंदाज जाहीर अमोल बावस्कार बुलढाणा/ पल्लवी पाटील (संपादक -...
जूनमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महापुराची शक्यता — भेंडवळ घटमांडणीतून वर्षभराचा अंदाज जाहीर
अमोल बावस्कार बुलढाणा/ पल्लवी पाटील
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भेंडवळ:- सुमारे ३५० ते ३७० वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीद्वारे यंदाच्या वर्षातील पाऊस, पिकांची स्थिती, तसेच देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि संरक्षण परिस्थितीबाबतचे अंदाज जाहीर करण्यात आले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली होती. त्यानंतर आज सूर्योदयावेळी निरीक्षण करून वर्षभराचे भाकीत सांगण्यात आले.
या वेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. या पारंपरिक घटमांडणीवर अनेक शेतकरी विश्वास ठेवत असून त्यानुसार शेतीचे नियोजन करत असतात. मात्र, "एबीपी माझा" या अंदाजांची अधिकृत पुष्टी करत नाही.
यंदाच्या घटमांडणीतील प्रमुख निष्कर्ष
जून महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज
जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस
ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी पाऊस
अनेक भागात महापुरामुळे नुकसान होण्याची शक्यता
कापूस व तांदूळ पिकांचे उत्पादन चांगले
तीळ व बाजरी पिके भरपूर येण्याची शक्यता
ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण
पिकांवर रोगराईचे प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज
देशाची संरक्षण स्थिती तणावपूर्ण राहण्याची शक्यता
आर्थिक स्थिती अपेक्षेइतकी मजबूत राहणार नाही
काय आहे भेंडवळची घटमांडणी?
भेंडवळमध्ये दरवर्षी गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या कालावधीत निसर्गाचे निरीक्षण करून वर्षभराचे हवामान, पर्जन्यमान, पिकांची स्थिती, तसेच राजकीय आणि आर्थिक घडामोडींचा अंदाज वर्तवण्याची परंपरा आहे. ही परंपरा सुमारे ३५० वर्षांपूर्वी तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केली असून त्यांचे वंशज आजही ती जपून आहेत.
घटमांडणीची पद्धत
परंपरेनुसार शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात मातीचा घट ठेवला जातो. घटात मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवली जाते. घागरीवर पापड, भजे, वडा, सांडोई, कुरडई ठेवली जाते. घटाभोवती पान-सुपारीसह अठरा प्रकारची धान्ये वर्तुळाकार मांडली जातात. यामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा आदींचा समावेश असतो.
शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाची?
भेंडवळ घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातून हजारो शेतकरी येथे येतात. या अंदाजांच्या आधारे ते पुढील हंगामासाठी पेरणीचे नियोजन करतात. पावसाचे महिनावार अंदाज आणि पिकांची स्थिती लक्षात घेऊन शेतीचा आराखडा तयार करण्यात या परंपरेचा उपयोग होतो. त्यामुळे निसर्गाच्या अनिश्चिततेतही शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा आधार ठरत आहे.

No comments