मलकापूरात नागरी समस्यांचा स्फोट : प्रहारचा इशारा – “सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा” अमोल बावस्कार बुलढाणा : (संपादक -:- हेम...
मलकापूरात नागरी समस्यांचा स्फोट : प्रहारचा इशारा – “सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा”
अमोल बावस्कार बुलढाणा :
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर शहरातील वाढत्या नागरी समस्यांवरून मलकापूर नगर परिषद प्रशासनाविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करत, “शहराला तात्काळ मूलभूत सुविधा द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा,” असा स्पष्ट इशारा प्रहारचे उपजिल्हाप्रमुख अजय लक्ष्मण टप यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रहारच्या निवेदनात शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर तीव्र टीका करण्यात आली आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
तसेच, शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून नागरिकांना १५-१५ दिवस पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हक्काचे पाणी मिळत नसल्याने विकतचे पाणी घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. “हे वॉटर मॅनेजमेंट आहे की जनतेची छळवणूक?” असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थितीही बिकट झाली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एकीकडे कामगारांना वेठीस धरले जात असताना, दुसरीकडे काही अधिकारी बायोमेट्रिक हजेरी न लावता केवळ रजिस्टरवर सह्या करून नियमांना बगल देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.
याशिवाय, दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप वितरित न झाल्याने दिव्यांग बांधवांमध्ये नाराजी वाढत असल्याचे प्रहारने नमूद केले आहे.
नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या सर्व समस्यांवर उपाययोजना कराव्यात, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार त्वरित द्यावेत आणि बायोमेट्रिक हजेरीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने “घागर पूजन” आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असेही अजय टप यांनी स्पष्ट केले आहे.

No comments