जळगावच्या तरुणाची राष्ट्रीय स्तरावर झेप; श्रीराज पाटील यांची ‘ओ.एम.जी. बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...
जळगावच्या तरुणाची राष्ट्रीय स्तरावर झेप; श्रीराज पाटील यांची ‘ओ.एम.जी. बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जिद्द, चिकाटी आणि कलेप्रती असलेल्या प्रचंड ओढीच्या जोरावर जळगाव येथील तरुण कलाकार श्रीराज किशोरकुमार पाटील याने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. श्रीराजने साकारलेल्या अद्वितीय खडू शिल्पकलेची दखल घेत त्याची ‘ओ.एम.जी. नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी मा. रोहन घुगे यांच्या हस्ते त्याचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. खडूवर अत्यंत बारकाईने आणि कलात्मक पद्धतीने कोरीव काम करत श्रीराजने अप्रतिम शिल्प साकारले आहे. या सूक्ष्म कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून त्याच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशामागे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर सुनिल दाभाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. गुरु-शिष्यांच्या या जोडीने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सत्कार सोहळ्यादरम्यान श्रीराजने कृतज्ञता व्यक्त करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वतः साकारलेले देखणे खडू शिल्प जिल्हाधिकाऱ्यांना सप्रेम भेट दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीराजच्या कलेचे कौतुक करत तरुणांनी अशा नवकल्पनांमधून देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. या प्रसंगी श्रीराजची आई वनश्री पाटील, वडील किशोरकुमार पाटील, बहीण कु. सौम्या पाटील, आजी सौ. मीनाक्षी वासुदेव देशमुख, आजोबा वासुदेव हिंमतराव देशमुख तसेच आजी आशालता मनोहर पाटील व आजोबा मनोहर मुरलीधर पाटील आणि मार्गदर्शक सुनिल दाभाडे उपस्थित होते. आपल्या मुलाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होणारा सन्मान पाहून आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. “कलेला वयाचे बंधन नसते. श्रीराजने आपल्या कौशल्याने हे सिद्ध करून दाखवले आहे,” असे गौरवोद्गार सुनिल दाभाडे यांनी काढले. श्रीराज पाटील यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या कलाक्षेत्राची मान उंचावली असून, त्यांच्या कामगिरीतून अनेक तरुणांना प्रेरणा मिळणार आहे.

No comments