कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई..अपहरण झालेल्या १६ वर्षीय मुलीची श्रीरामपुरातून सुटका आरोपीस केले गजाआड सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:...
कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई..अपहरण झालेल्या १६ वर्षीय मुलीची श्रीरामपुरातून सुटका आरोपीस केले गजाआड
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान' अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून,या प्रकरणातील संशयित आरोपीला श्रीरामपूर येथून अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि.९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बेपत्ता झाली होती.संशयित आरोपी प्रकाश सावंत (रा. बोल्हेगाव MIDC, अहिल्यानगर) याने या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी दिली होती. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर १००/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस संशयित आरोपी आणि मुलीचा शोध घेत होते,मात्र ते वारंवार जागा बदलत असल्याने मिळून येत नव्हते.दरम्यान,कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,सदर आरोपी आणि मुलगी श्रीरामपूर शहरात वास्तव्यास आहेत.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून निरीक्षक गायकवाड यांनी तातडीने तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले.या पथकात महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, अमोल गाडे आणि संदीप शेंडगे यांचा समावेश होता.कोतवाली पोलिसांचे पथक तात्काळ श्रीरामपूर येथे रवाना झाले. तेथे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मदतीने बारकाईने तपास करण्यात आला.अत्यंत गुप्ततेने राबवलेल्या या मोहिमेत पोलिसांनी आरोपी प्रकाश सावंत याला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. आरोपीला कोतवाली पोलीस ठाण्यात आणून रीतसर अटक करण्यात आली आहे.ही यशस्वी कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर) डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, रोहिणी दरंदले,याकूब सय्यद, अमोल गाडे,संदीप शेंडगे आणि दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांनी केली आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments