तांदुळ व्यापाराच्या आमिषाने कोटींचा घोटाळा..! व्यापाऱ्याला 1.11 कोटींचा गंडा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सचिन मोकळं अहिल्यानगर (संपा...
तांदुळ व्यापाराच्या आमिषाने कोटींचा घोटाळा..! व्यापाऱ्याला 1.11 कोटींचा गंडा कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर:-शहरातील स्वास्तीक चौक, गणेशवाडी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला तांदुळाच्या व्यापारातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल 1 कोटी 11 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पीयूष संजय शिंगवी (वय 35) यांनी मंगळवारी (दि. 31 मार्च) रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सतिष सिद्रप्पा कोरी, अर्थव अशोक कोरी (दोघे रा. कर्वेनगर, पुणे), संमेध सुभाष बसववडे (रा. डोंबिवली, जि. ठाणे, सध्या रा. सिंहगड रस्ता, पुणे) आणि प्रकाश सरजू तंडन (रा. छत्तीसगड, सध्या रा. सिंहगड रस्ता, पुणे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, ही संपूर्ण फसवणूक सन 2025 पासून टप्प्याटप्प्याने रचण्यात आली होती. संशयित आरोपींनी संगनमत करून तांदुळ व्यापारात मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी विविध बनावट कागदपत्रांचा आधार घेत व्यापाऱ्याला जाळ्यात ओढले.
यानंतर आरोपींनी शिंगवी यांच्याकडून 1 कोटी 7 लाख रुपयांचा तांदूळ उचलला, मात्र त्याचे पैसे दिले नाहीत. एवढ्यावरच न थांबता, माल पोहोचवण्याच्या नावाखाली अजून 4 लाख 60 हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले. अशा प्रकारे एकूण 1 कोटी 11 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
माल घेतल्यानंतर आरोपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करत संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीयूष शिंगवी यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख पुढील तपास करीत आहेत. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.शहरातील व्यापाऱ्यांनी व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली असून, मोठ्या नफ्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

No comments