धक्कादायक..अहिल्यानगर जिल्ह्यात ६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित..!'लिंकिंग' आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कृषी विभागाचा सर्जिकल...
धक्कादायक..अहिल्यानगर जिल्ह्यात ६ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित..!'लिंकिंग' आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कृषी विभागाचा सर्जिकल स्ट्राईक..कोपरगावसह 'या' तालुक्यांना दणका
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर :-रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर खत विक्रीत अनियमितता आणि शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरुद्ध जिल्हा कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आणि खतांच्या 'लिंकिंग'च्या तक्रारींची गंभीर दखल घेत, भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
या तालुक्यांत झाली कारवाई:
कृषी विभागाने केलेल्या या धडक कारवाईत सर्वाधिक फटका कोपरगाव तालुक्याला बसला आहे.
कोपरगाव तालुका: ३ कृषी सेवा केंद्रे
अकोले तालुका: १ कृषी सेवा केंद्र
श्रीगोंदा तालुका: १ कृषी सेवा केंद्र
शेवगाव तालुका: १ कृषी सेवा केंद्र
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात युरियाची मोठी मागणी होती.याचाच फायदा घेत काही विक्रेते युरियासोबत इतर निविष्ठांची सक्ती (लिंकिंग) करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या होत्या. कृषी विभागाने तपासणी मोहीम राबवली असता खालील गंभीर त्रुटी आढळल्या:
१. ई-पॉस मशीनवरील साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत.
२. खत विक्रीमध्ये होणारे गैरप्रकार आणि नियमांचे उल्लंघन.
३. कृषी निविष्ठा कायदा आणि अत्यावश्यक सेवा अधिनियमातील अटींचा भंग.
"जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, युरिया व अन्य खते वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभाग सज्ज आहे. कोणत्याही केंद्राने खतांची टंचाई भासवून किंवा लिंकिंग करून शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास गय केली जाणार नाही. तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी थेट संपर्क साधावा."
— सुधाकर बोराळे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर)
शेतकऱ्यांसाठी आवाहन:
रब्बी हंगामात खते किंवा बियाणे उपलब्धतेबाबत काही अडचण असल्यास किंवा कृषी सेवा केंद्रांकडून लूट होत असल्यास, शेतकऱ्यांनी तातडीने तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments