निरोप समारंभात चौथीच्या विद्यार्थ्यांच्या भावना दाटल्या; मुक्ताईनगर येथील शाळेत भावुक वातावरण सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत ...
निरोप समारंभात चौथीच्या विद्यार्थ्यांच्या भावना दाटल्या; मुक्ताईनगर येथील शाळेत भावुक वातावरण
सतिश गायकवाड मुक्ताईनगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर : सौ. तु. ल. कोळंबे प्राथमिक विद्यामंदिर, मुक्ताईनगर येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शाळा आणि शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांना भावूक केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेबद्दलचे प्रेम व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी भाषणातून भावना मांडल्या, तर काहींनी नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
या प्रसंगी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आठवणी म्हणून पृथ्वीचा गोल (ग्लोब) भेटवस्तू म्हणून देऊन कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी एकत्र येत कचोरीचा आस्वाद घेत आनंद लुटला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे यांनी केले. वर्ग शिक्षिका श्रीमती आशा कोळी व श्री राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती प्रणिता चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री मनोज राठोड यांनी केले.
या कार्यक्रमाला मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर, स्कूल कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम महाजन, श्री नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी तसेच श्री महेश पाटील उपस्थित होते.

No comments