चोपडा येथे स्व. शरदचंद्रिका अक्का नर्सिंग कॉलेजमध्ये ‘जागतिक हिवताप (मलेरिया) दिन’ साजरा चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड...
चोपडा येथे स्व. शरदचंद्रिका अक्का नर्सिंग कॉलेजमध्ये ‘जागतिक हिवताप (मलेरिया) दिन’ साजरा
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा: — जागतिक हिवताप (मलेरिया) दिनानिमित्त स्व. शरदचंद्रिका अक्का पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, चोपडा येथे जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. हिवताप व इतर डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांविषयी विद्यार्थ्यांमध्ये व समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर तथा जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद यशवंतराव सोनवणे यांच्या सूचनेनुसार, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रसाद पाटील व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी सौ. डॉ. निलिमा देशमुख यांनी नर्सिंग विद्यार्थ्यांना हिवताप आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करत आरोग्य शिक्षण दिले. विद्यार्थी दशेत मिळवलेले ज्ञान भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यंदाच्या जागतिक हिवताप दिनाची थीम “Driven to End Malaria: Now We Can. Now We Must.” (“मलेरिया संपवण्यासाठी सज्ज: आता आपण करू शकतो, आता आपण केलेच पाहिजे.”) अशी असून “Zero Malaria” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शासन, आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमात हिवताप हा ॲनाफिलीस मादी डासाच्या चाव्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार असून Plasmodium परजीवीमुळे तो पसरतो, अशी माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात प्रामुख्याने प्लास्मोडियम व्हायव्याक्स व प्लास्मोडियम फॅलसीफेरम हे प्रकार आढळतात. ताप, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ ही त्याची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.
डासांमार्फत डेंग्यू, चिकनगुनिया व हत्तीरोग हे आजारही पसरतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखणे हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचे अधोरेखित करण्यात आले. घर व परिसरात पाणी साचू न देणे, आठवड्यातून एक दिवस “कोरडा दिवस” पाळणे, मच्छरदाणी व डासप्रतिबंधक साधनांचा वापर करणे, तसेच ताप आल्यास त्वरित तपासणी करून उपचार घेणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
तालुका हिवताप पर्यवेक्षक जगदीश बाविस्कर यांनी जागतिक हिवताप दिनाचे महत्त्व स्पष्ट करत मलेरिया निर्मूलनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. तसेच आरोग्य सहाय्यक विजय देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी, शहरी भागातील आरोग्य सेवक रामुला मडावी, अशोक वारे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती करुणा चंदानशिव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी “स्वच्छता आणि जागरूकता हीच हिवतापाविरुद्धची सर्वोत्तम लस आहे” हा संदेश देत नागरिकांनी डास निर्मूलनासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.


No comments