लोहाऱ्याहुन फैजपूर येथे येणारी पाणीपुरवठा पाइपलाईनला मोठी गळती; हजारो लिटर पाण्याची नासाडी, नागरिक संतप्त इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- ...
लोहाऱ्याहुन फैजपूर येथे येणारी पाणीपुरवठा पाइपलाईनला मोठी गळती; हजारो लिटर पाण्याची नासाडी, नागरिक संतप्त
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपुर : लोहाऱ्या हुन येणारी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाईनला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून पाईपलाईन मधून सतत पाणी वाहत असून रस्त्यावर चिखल व पाण्याचे डबके साचत आहेत. यामुळे वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरून जाताना घसरण्याचा धोका वाढला असून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे नागरिकांना “पाणी वाचवा” असा संदेश देणारी नगरपालिका प्रत्यक्षात मात्र अशा गळतींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाण्याची टंचाई भासत असताना हजारो लिटर पाणी वाया जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन पाइपलाईनची गळती बंद करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काहींनी दिला आहे. दरम्यान, या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन गळती दुरुस्त करावी आणि पाण्याची होणारी नासाडी थांबवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments