सोयाबीन विमा प्रश्नावर स्वराज्य पक्ष आक्रमक, शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवा...
सोयाबीन विमा प्रश्नावर स्वराज्य पक्ष आक्रमक, शेतकऱ्यांना विमा न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा:- खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले असताना, पीक विमा कंपनीने राबवलेल्या पक्षपाती धोरणाविरोधात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित राहिलेल्या मंडळांतील शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा तालुका कृषी अधिकारी यांना लेखी निवेदनातुन देण्यात आला आहे.
या संदर्भात तालुका कृषी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चालू हंगामात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे हाताशी आलेले सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले. शासनाने मदत जाहीर केली असली, तरी विमा कंपनीने तालुक्यातील काही विशिष्ट महसूल मंडळांना विम्याच्या लाभातून जाणीवपूर्वक वगळले आहेत. संपूर्ण तालुक्यात नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप सारखेच असतानाही कंपनीने केलेला हा दुजाभाव शेतकऱ्यांवर मोठा अन्याय आहे.करीता विम्यातून वगळलेल्या महसूल मंडळांचा तात्काळ समावेश करून विमा रक्कम मंजूर करावी,चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे निकष संपूर्ण तालुक्यासाठी समान लावून सरसकट भरपाई द्यावी,विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार न करता तयार केलेल्या अहवालांची फेरचौकशी व्हावी,शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम जमा न झाल्यास महाराष्ट्र स्वराज्य पक्ष रस्त्यावर उतरून सरकार आणि विमा कंपनी विरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती कृषीमंत्री, कृषी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी विद्याधर अवताडे, शुभम चिचोलकार, शुभम इसापुरे,सचिन जुमळे,आकाश डोंगरे,सुमित ईंगोले,गोपाल घंघाळ,विकी महाले,हरिश ईंगोले,निखिल अवताळे,चेतन पिंजरकर,यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते.

No comments