adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अक्षय तृतीयेच्या दिवशी मलकापूर नगर परिषदेत ‘घागर पूजन’ करून प्रहारचा अनोखा निषेध

 अक्षय तृतीयेच्या दिवशी मलकापूर नगर परिषदेत ‘घागर पूजन’ करून प्रहारचा अनोखा निषेध  अमोल बावस्कार  बुलढाणा (संपादक – हेमकांत गायकवाड) मलकापूर...

 अक्षय तृतीयेच्या दिवशी मलकापूर नगर परिषदेत ‘घागर पूजन’ करून प्रहारचा अनोखा निषेध 


अमोल बावस्कार  बुलढाणा

(संपादक – हेमकांत गायकवाड)

मलकापूर नगर परिषदेतील प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने अक्षय तृतीयेच्या दिवशी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. रविवारी (१९ एप्रिल) जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी नगर परिषद इमारतीतच ‘घागर पूजन’ करून श्राद्ध घालत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

नगर परिषद निवडणुकीनंतर चार महिन्यांचा कालावधी उलटूनही शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप प्रहारच्या वतीने करण्यात आला. शहरात साफसफाईचा पूर्ण बोजवारा उडाला असून मोठ्या प्रमाणात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साफसफाईसाठी लाखो रुपये खर्च होत असले तरी प्रत्यक्षात काम दिसत नसल्याची टीका करण्यात आली.

याशिवाय शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. नागरिकांना १५ दिवसांनी पाणी मिळत असल्याने अनेकांना विकत पाणी घ्यावे लागत असल्याचे सांगण्यात आले. दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्के निधी वेळेत वितरित होत नसल्याने त्यांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत आहेत.

कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणीही प्रलंबित असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

नगर परिषदेत बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य असतानाही अनेक अधिकारी व कर्मचारी रजिस्टरवरच हजेरी लावत असल्याने कामकाजात शिस्त राहिलेली नसल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.

निवडणुकीवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सत्ताधारी व पदाधिकारी अपयशी ठरत असल्याचा आरोप करत, “एका महिन्यात शहरातील मूलभूत समस्या मार्गी न लावल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हा उपप्रमुख अजय टप, शहराध्यक्ष शालीकराम पाटील, तालुकाध्यक्ष राहुल तायडे, बलराम बावस्कार, दिव्यांग संघटनेचे निलेश चोपडे, नागेश सुरंगे, प्रहार दिव्यांग शहर प्रमुख अनिल गोठी, संजय इंगळे, करण नायसे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

न्यायालयात जाण्याचा इशारा

“नगर परिषद प्रशासन व निवडून आलेले पदाधिकारी नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. अनेकदा निवेदने व तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे लवकरच नगर परिषदेतील सत्ताधारी मंडळींची बॉडी बरखास्त करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत,”

— अजय टप, जिल्हा उपप्रमुख, प्रहार जनशक्ती पक्ष, मलकापूर.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments