शेतकरी एकनाथ भोई यांच्या तत्परतेने कोल्ह्याच्या पिल्लाला जीवदान; वनविभागाची तात्काळ मदत गलंगी (ता. चोपडा) – मच्छिंद्र रायसिंग (संपादक -:-...
शेतकरी एकनाथ भोई यांच्या तत्परतेने कोल्ह्याच्या पिल्लाला जीवदान; वनविभागाची तात्काळ मदत
गलंगी (ता. चोपडा) – मच्छिंद्र रायसिंग
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
गलंगी तालुक्यातील अनेरजवळील वेळोदे येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ चुनीलाल भोई यांच्या सतर्कतेमुळे जखमी कोल्ह्याच्या पिल्लाला वेळेत उपचार मिळून जीवदान मिळाले आहे. वेळोदे शिवारातील आपल्या शेतात गेल्या दोन दिवसांपासून कोल्हा जातीचे लहान पिल्लू दिसत असल्याचे लक्षात येताच, एकनाथ भोई यांनी तत्काळ वनविभागाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती दिली. माहिती मिळताच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आर.एफ.ओ. बी. के. थोरात यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पाहणीदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत पिल्लाच्या कंबरेला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. त्यानंतर वनविभागाने पिंजऱ्याच्या साहाय्याने पिल्लाला सुरक्षित पकडून चोपडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथे पिल्लावर तातडीने उपचार करण्यात आले. या कार्यात वनरक्षक शुभम पाटील, राहुल पाटील, वनसेवक रोहित चौधरी, वाहनचालक मनोज मोरे तसेच शेतकरी एकनाथ भोई यांनी मोलाचे सहकार्य केले. आर.एफ.ओ. बी. के. थोरात म्हणाले, “घटनास्थळी पाहणी करताना पिल्लाची कंबर मोडल्याचे दिसून आले. त्याला तातडीने चोपडा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार केले. औषधोपचार व योग्य आहार दिल्यामुळे त्याच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.” यावेळी थोरात यांनी शेतकरी एकनाथ भोई यांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

No comments