जनावर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; हनुमान नगरमध्ये संशयितास रंगेहात पकडले अमोल बावस्कार | बुलढाणा (संपादक| हेमकांत गायकवाड) मलकापूर ग्रामीण भा...
जनावर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; हनुमान नगरमध्ये संशयितास रंगेहात पकडले
अमोल बावस्कार | बुलढाणा
(संपादक| हेमकांत गायकवाड)
मलकापूर ग्रामीण भागातील हनुमान नगर परिसरात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या जनावर चोरीच्या घटनांमध्ये आज एक महत्त्वाची घडामोड समोर आली. स्थानिक युवकांनी गस्त घालत असताना एका संशयिताला गोरा (बैल) गाडीत भरताना रंगेहात पकडल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४.०० ते ५.०० वाजण्याच्या सुमारास हनुमान नगर येथील काही युवक जनावर चोरी रोखण्यासाठी जागरण करून गस्त घालत होते. यावेळी त्यांना एक व्यक्ती गोरा गाडीत भरताना संशयास्पद अवस्थेत दिसली. त्यांनी तत्काळ संबंधित व्यक्तीला अडवून चौकशी केली असता तो हनुमान नगर येथील रहिवासी रघुनाथ नारायण बोरले उर्फ बाबू बोरले असल्याचे समोर आले.
सदर गोरा हा सुपेश सुनील वानखेडे (वय २६, व्यवसाय – फुल विक्री, रा. हनुमान नगर, मलकापूर) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. सुपेश वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीच्या जनावरांपैकी यापूर्वीही दोन गायी आणि एक गोरा चोरीला गेला होता. परिसरात सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
दि. २७ एप्रिल रोजी त्यांचा अंदाजे २०,००० रुपये किमतीचा, दीड वर्षांचा काळ्या-लाल रंगाचा जर्सी जातीचा गोरा हरवला होता. त्याचा शोध घेत असताना आज पहाटे मित्रांकडून मिळालेल्या माहितीवरून ते घटनास्थळी पोहोचले. युवकांनी दिलेल्या वर्णनावरून तो गोरा स्वतःचाच असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी संशयिताशी संपर्क साधला असता, त्याने गोरा पारपेठ येथे बांधून ठेवलेला असल्याचे सांगितले. तेथे जाऊन पाहणी केली असता संबंधित गोरा लोखंडी खांबाला बांधलेला आढळून आला.
या प्रकरणी सुपेश वानखेडे यांनी मलकापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बजरंग दल शहर सहसंयोजक रितेश अशोकराव दहिभाते यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून प्रकरणाची माहिती ठाणेदार गिरी साहेब यांना दिली. यावेळी सार्थक तांबडे, निलेश गवात्रे, रोशन तळेकर, अक्षय वराडे, दत्तात्रय दंडे, सचिन जावरे, कुणाल नारखेडे, श्रीकांत कुलकर्णी, मोहित सुलताने, श्रावण बोबटकर, विठ्ठल बोबटकर, रोशन कांडेलकर, शुभम नारखेडे, पवन जावरे, विशाल पवार, पवन लाड आदी नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
या घटनेमुळे परिसरातील जनावर चोरीच्या वाढत्या प्रकारांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


No comments