adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

लातूर हादरलं! संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप

 लातूर हादरलं! संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप  लातूर, जि. प्र. (उत्तम माने) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 लातूर हादरलं! संतांच्या पादुका दर्शन सोहळ्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप 


लातूर, जि. प्र. (उत्तम माने)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लातूर जिल्ह्यातील खंडापूर शिवारात काही महिन्यांपूर्वी भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलेला संतांच्या पादुका दर्शन सोहळा आता गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या भव्य धार्मिक कार्यक्रमावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आरोप होत असून, संपूर्ण वारकरी संप्रदायात खळबळ उडाली आहे.

सोहळ्यासाठी जमा झालेल्या निधीपैकी सुमारे 5 ते 6 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात येत आहे. मात्र उर्वरित निधीचा स्पष्ट हिशोब न दिल्याने संशय अधिकच गडद झाला आहे. आयोजक समितीतील काही सदस्यांनी थेट प्रमुख आयोजक किशोर महाराज शिवणीकर यांच्यावर गंभीर आरोप करत आर्थिक अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला आहे.

या सोहळ्यासाठी आमदार, खासदार तसेच विविध राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात देणग्या मिळाल्याचेही समोर आले असून, या देणग्यांचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे श्रद्धेच्या कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा आरोप होत असून, या देणग्यांमागील उद्देशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वारकरी संप्रदायातील अनेकांनी यामुळे संत परंपरेचा अवमान होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी तसेच सर्व देणग्यांचा हिशोब पारदर्शकपणे जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. वारंवार विचारणा करूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त समिती सदस्यांनी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपांच्या भोवऱ्यात असलेले प्रमुख आयोजक सध्या संपर्काबाहेर असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्या फोनला प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिकच वाढत आहे.

या घडामोडींमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून “जिथे भक्ती असावी तिथे भ्रष्टाचार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. श्रद्धा आणि पारंपरिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आता पोलिस प्रशासन या आरोपांची कितपत दखल घेते, चौकशीतून सत्य बाहेर येते का आणि कोट्यवधींच्या निधीचा हिशोब स्पष्ट होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments