तिर्डे ग्रामपंचायतीतील पाणीप्रश्नावर सत्य दडपण्याचा प्रयत्न? ग्रामस्थ व माध्यमांचा संताप पेठ तालुका प्रतिनिधी | (संपादक -:- हेमकांत गायकवा...
तिर्डे ग्रामपंचायतीतील पाणीप्रश्नावर सत्य दडपण्याचा प्रयत्न? ग्रामस्थ व माध्यमांचा संताप
पेठ तालुका प्रतिनिधी |
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तिर्डे ग्रामपंचायत, ता. पेठ येथे पाणीपुरवठा व संबंधित कामांबाबत गंभीर समस्या समोर आल्यानंतर 18 एप्रिल 2026 रोजी प्रकाशित करण्यात आलेली बातमी आता अधिकच चर्चेत आली आहे. ही बातमी कोणत्याही अफवा, अंदाज किंवा वैयक्तिक हेतूवर आधारित नसून प्रत्यक्ष पाहणी, ग्रामस्थांच्या तक्रारी, अधिकृत कागदपत्रे आणि ठोस व्हिडिओ पुरावे यांच्या आधारे प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामस्थांनी वारंवार पाणीपुरवठा, दूषित पाणी, जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनेलने वस्तुस्थिती समोर आणत व्हिडिओ आणि बातमी सोशल मीडियावर प्रसारित केली. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष स्थळ पाहणी व निष्पक्ष चौकशी न करता संबंधितांनी आमच्या न्यूज चॅनेलने चुकीची बातमी दिल्याचा खोटा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत — अधिकारी सांगतील तेच सत्य आणि गावकरी व माध्यमे सांगतील ते खोटे का? जनतेच्या समस्या मांडणाऱ्या पत्रकारांनाच चुकीचे ठरवण्याचा हा प्रयत्न नाही का?
हा प्रकार केवळ निषेधार्ह नसून लोकशाही व्यवस्थेवर थेट आघात करणारा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जनहिताची बातमी दडपणे, पत्रकारांवर दबाव टाकणे, माध्यमांची बदनामी करणे, सत्य लपवण्याचा प्रयत्न करणे तसेच पत्राद्वारे धमक्या देत पदाचा गैरवापर करणे—हे सर्व प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला मानले जात आहेत. माध्यमे ही जनतेचा आवाज असून सत्य मांडणे हे त्यांचे कर्तव्य आहे. जर माध्यमांवरच दबाव टाकून सत्य दडपण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो थेट जनतेच्या अधिकारांवर घाला असल्याचे मत व्यक्त होत आहे. ग्रामस्थ व पत्रकारांनी संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल देणे तात्काळ बंद करावे, प्रत्यक्ष व निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर मांडावे, अशी ठाम मागणी केली आहे. तसेच दोषींवर तात्काळ प्रशासकीय, कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे. “जनतेचा संयम कायमचा नसतो; एक दिवस जनता स्वतःच योग्य तो मार्ग दाखवेल,” असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. सत्यासाठी लढा सुरूच राहील, जनतेचा आवाज दाबला जाणार नाही, असा निर्धार स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

No comments