adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोरक्षणासाठी शेतकरीच पर्याय; जप्त गायी शेतकऱ्यांना दत्तक द्या — कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 गोरक्षणासाठी शेतकरीच पर्याय; जप्त गायी शेतकऱ्यांना दत्तक द्या — कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  चोपडा प्रतिनिधी/ विश्राम तेले चौगाव  ...

 गोरक्षणासाठी शेतकरीच पर्याय; जप्त गायी शेतकऱ्यांना दत्तक द्या — कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 


चोपडा प्रतिनिधी/ विश्राम तेले चौगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा:- राज्यात गोरक्षण आणि शेतीची स्थिती सुधारण्यासाठी जप्त करण्यात आलेल्या गायी शेतकऱ्यांना दत्तक देण्याची योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी कृती समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या संदर्भात सिमला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

देशभर गोरक्षक जीवाची बाजी लावून गायी वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना, या कार्याला प्रत्येक नागरिकाने हातभार लावणे गरजेचे असल्याचे समितीने म्हटले आहे. “गाय वाचवण्याची खरी क्षमता शेतकऱ्यांमध्येच आहे; मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांना गायी पाळणे शक्य होत नाही,” असे समितीचे मत आहे.

सिमला उच्च न्यायालयाने “भारतीय गोवंश संरक्षण संवर्धन परिषद, हिमाचल प्रदेश” यांनी दाखल केलेल्या याचिका क्र. CWP 6631/2014 च्या निकालात महत्त्वपूर्ण निर्देश दिले होते. त्यानुसार, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत (MSP) देण्याबरोबरच, तोपर्यंत भावांतर योजना लागू करण्याचे आदेश केंद्र व राज्य सरकारांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही योजना केवळ कडधान्यांपुरती मर्यादित न ठेवता भाजीपाला आणि इतर नाशवंत पिकांसह एकूण 105 पिकांवर लागू करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

समितीच्या मते, महाराष्ट्रात या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्यास रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेक कमी होईल, तसेच कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमाणही घटण्यास मदत होईल.

दरम्यान, गोरक्षकांनी वाचवलेल्या गायी मोठ्या प्रमाणावर गोशाळांमध्ये पाठवल्या जात आहेत. मात्र, गोशाळांचा खर्च भागवणे अत्यंत कठीण होत असून अनेक ठिकाणी गायींची अवस्था दयनीय असल्याचे वास्तवही समितीने मांडले आहे.

या पार्श्वभूमीवर, जप्त गायी पाळण्यास इच्छुक शेतकऱ्यांना दत्तक देण्याची योजना सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दत्तक घेणाऱ्या शेतकऱ्यांनी गायींचा विमा काढावा आणि गायीचा मृत्यू झाल्यास मिळणारी रक्कम गोशाळांच्या देखभालीसाठी वापरावी, असा प्रस्तावही समितीने मांडला आहे. या योजनेतून गोशाळांवरील ताण कमी होईल आणि शेतीसाठी नैसर्गिक खतांची उपलब्धता वाढून शेती अधिक समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सदर निवेदन एस.बी. पाटील, डॉ. रवींद्र निकम, अजित पाटील, मोहन पाटील, शाळीग्राम करंकाळ, प्रा. प्रदीप पाटील आणि कुलदीपसिंग पाटील यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्द केले असून, ते मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

No comments